नवी मुंबईत विजेच्या लपंडावामुळे नागरिक त्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 27 February 2020

नवी मुंबईतील अनेक भागांत ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे.

नवी मुंबई : नवी मुंबईतील अनेक भागांत ऐन उन्हाळ्यात विजेचा लपंडाव सुरू झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून रात्रीच्या वेळेस वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे, नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. विजेचे देयक वेळेत भरूनदेखील, नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागत आहे. त्यातच सध्या बारावीची परीक्षा सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत तक्रार करण्यासाठी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता फोन उचलला जात नाही; तर प्रत्यक्ष त्या कार्यालयात गेले असता, कर्मचारी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून करण्यात येत आहेत. 

ही बातमी वाचली का? ...अन्‌ कोरोना शोधण्यासाठी अधिकारी घरोघरी!

नवी मुंबईकरांवर महावितरणच्या भारनियमनाचे संकट नसले, तरी अनेक भागात कोणत्या ना कोणत्या कारणाने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली परिसरात गेल्या दोन दिवसांपासून सतत विजेचा लपंडाव सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. कोपरखैरणे सेक्‍टर-12 बी लगतचा परिसर, ऐरोली सेक्‍टर-7, ऐरोली सेक्‍टर-1 मधील नाक्‍यावर देखील सातत्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. हिवाळा संपून उन्हाळा सुरू झाला आहे. परिणामी, रात्री-अपरात्री बत्ती गुल होत असल्याने, ऐन उकाड्यात नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. तसेच खाडीकिनारी असलेल्या भागात वाढलेल्या डासांमुळे रात्रभर जागे राहावे लागत आहे. त्यातच बारावीच्या मुलांची परीक्षा सुरू असल्याने त्यांच्या अभ्यासावर या सर्वांचा मोठा परिणाम होत असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून मोठा संताप व्यक्त केला जात आहे. अशाच प्रकारातून गतवर्षी नागरिकांनी महावितरणच्या कार्यालयाला मध्यरात्रीच्या सुमारास घेराव घातला होता. या वर्षी पुन्हा विजेचा लपंडाव सुरू झाल्याने महावितरणच्या कारभाराबाबत नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे. वीजवाहिन्या भूमिगत असल्यामुळे एखाद्या ठिकाणी वीजवाहिनीत दोष आढळल्यास, महावितरणच्या कर्मचाऱ्यांना दोष शोधण्यासाठी तासन्‌ तास वेळ जात आहे. 

ही बातमी वाचली का? सुसज्ज मीनाताई ठाकरे रुग्णालयात डॉक्‍टरच नाही!

उन्हाळा सुरू झाल्यापासून वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे संगणक; तसेच अन्य इलेक्‍ट्रिक वस्तू खराब होऊ शकतात, याची भीती वाटते. वेळेत देयक भरूनही, सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याने मनस्ताप सहन करावा लागत आहे. 
- बाबु लुस्टे, नागरिक, ऐरोली. 

बारावीची परीक्षा सुरू असल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाल्यांनतर मनस्ताप सहन करावा लागतो. परीक्षेचा अभ्यास करताना अडचणी येतात. त्यातच मच्छरांचे प्रमाणदेखील वाढले असून, उकाड्याचादेखील त्रास होत आहे. 
- अमय कुलकर्णी, विद्यार्थी 

दहावीच्या परीक्षा आता तोंडावर आल्या असून विजेचा लंपडाव सुरू झाल्यामुळे याचा त्रास सहन करावा लागत आहे; तरी महावितरणकडून वीजपुरवठा खंडित झाल्यांनतर त्याची तत्काळ दखल घेण्यात यावी. 
- संतोष पाटील, विद्यार्थी 

नवी मुंबईमध्ये एसएसएमआर योजनेंतर्गत कामे सुरू आहेत; तर वीज वाहिन्या भूमिगत असल्यामुळे तांत्रिक बाबींमुळे त्या नादुरुस्त झाल्या आहेत. त्या दुरुस्त करण्यात येतात. शहरात वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे. 
- आर. बी. माने, अधीक्षक, अभियंता महावितरण.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens suffer due to electric strike in Navi Mumbai