सुसज्ज मीनाताई ठाकरे रुग्णालयात डॉक्‍टरच नाही!

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 26 February 2020

नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालय सर्व सोई-सुविधांनी सज्ज असल्याचा दावा पालिकेमार्फत केला जातो; मात्र असे असले तरी गरजेच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याने, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची परवड होत आहे.

नवी मुंबई : नेरूळ येथील मीनाताई ठाकरे रुग्णालय सर्व सोई-सुविधांनी सज्ज असल्याचा दावा पालिकेमार्फत केला जातो; मात्र असे असले तरी गरजेच्या वेळी डॉक्‍टर उपलब्ध होत नसल्याने, या ठिकाणी येणाऱ्या रुग्णांची परवड होत आहे. या सात मजली रुग्णालयाचा डामडौल पाहता "बडा घर पोकळ वासा' असे म्हणण्याची वेळ रुग्णांवर आली आहे. 

ही बातमी वाचली का? रुग्णवाहिका चालकाची मुलगी झाली एमबीबीएस डॉक्टर

गेल्या वर्षी ऑगस्टनंतर झालेल्या डॉक्‍टरांच्या भरती प्रक्रियेत मीनाताई ठाकरे रुग्णालयातील रिक्त पदे भरली जातील, तंत्रज्ञ उपलब्ध केले जातील, असा दावा आरोग्य विभागाकडून केला जात होता. तसेच सोनोग्राफीसारख्या इतर अत्यावश्‍यक सुविधा उपलब्ध करत रुग्णालय सुरळीत सुरू झाल्याचे भासवण्यातही आले. मात्र, अजूनही पुरेशा कर्मचाऱ्यांच्या अभावामुळे येथे येणाऱ्या रुग्णांची, गर्भवती महिलांची तासन्‌ तास रखडपट्टी होत आहे. या रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या एका गर्भवती महिलेला सोनोग्राफीसाठी डॉक्‍टर उपलब्ध नसल्याने व रक्तचाचणी होत नसल्याने रात्रीच्या सुमारास खासगी रुग्णालय गाठावे लागले; तर नेरूळच्या स्थानिक आरती चौहान यांनादेखील रुग्णालयात पुरेसा कर्मचारीवर्ग उपलब्ध नसल्याने लसीकरणासाठी अर्धा तास अधिक वाट पाहावी लागली. याबाबत चौकशी केली असता रुग्णालयात पुरेसे कर्मचारी नसल्याची बाब समोर आली आहे. नेरूळ, सीवूडस व परिसरातील गरजू, गोरगरीब रुग्णांकरिता पालिकेची रुग्णालये संजीवनी ठरू शकतात; मात्र सोई-सुविधा उपलब्ध असतानाही कर्मचारीवर्ग नसल्याने रुग्णांची परवड होत असल्याचे मत येथे उपचारासाठी येणारे रुग्ण व्यक्त करत आहेत. 

ही बातमी वाचली का? आदित्य ठाकरेंच्या लग्नालाही सरकार स्थगिती देईल
 

एका ठिकाणाहून प्राण्यांची सुटका करताना कुत्र्याचा दात लागल्याने सावधगिरी म्हणून रेबीजची लस घेण्याकरता मीनाताई ठाकरे रुग्णालयात गेले होते. मात्र, तेथे अर्धा तास वाट पाहावी लागली. कर्तव्यावर असलेली परिचारिका फिरतीवर असल्याने तिला यायला वेळ लागला. 
- आरती चौहान, नेरूळ. 

ही बातमी वाचली का? ...अन्‌ कोरोना शोधण्यासाठी अधिकारी घरोघरी! 

रुग्णालयात सर्व सोई-सुविधा उपलब्ध आहेत. पुरेसे कर्मचारीही आहेत. केवळ रक्ततपासणी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत केली जाते. रात्रीच्या वेळेस सोनोग्राफी करण्यासाठी डॉक्‍टरांना बोलावून घेतले जाते. त्यांनी येणे अपेक्षित आहे. एखाद्या वेळेमध्ये डॉक्‍टर उपलब्ध झाले नसतील तर त्याबाबत प्रथम माहिती करून घ्यावी लागेल. 
- डॉ. सविता रामरखियानी, वैद्यकीय अधीक्षक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Well equipped Minatai Thackeray hospital, but unavailability of doctor!