वाशीतील वाहतुकीच्या समस्येमुळे नागरिक हैराण

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

वाशी हे शहर, मुंबई व नवी मुंबईला जोडणारे एक महत्त्वाचे जंक्‍शन असल्यामुळे या भागातील लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. मात्र त्यामानाने या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने; तसेच रस्ते अरुंद असल्याने वाशी परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.  

मुंबई : मुंबईच्या वेशीवर खाडीलगत असलेले वाशी हे शहर, मुंबई व नवी मुंबईला जोडणारे एक महत्त्वाचे जंक्‍शन असल्यामुळे या भागातील लोकसंख्येबरोबरच वाहनांच्या संख्येत प्रचंड वाढ होत आहे. मात्र त्यामानाने या भागात पार्किंगची व्यवस्था नसल्याने; तसेच रस्ते अरुंद असल्याने वाशी परिसरातील वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे.  

नवी मुंबई शहराच्या विकासाची सुरुवात वाशी नोडपासून झाली. सिडकोच्या वतीने वाशी परिसराचा विकास करताना भविष्यातील वाढणारी लोकसंख्या, वाढत्या वाहनांच्या वाहतुकीचा प्रश्न; तसेच त्यांच्या पार्किंगचा प्रश्न विचारात घेतला गेला नाही. तसेच पार्किंगसाठी आवश्‍यक प्लॉट देखील राखीव ठेवले गेले नाहीत. त्यामुळे सध्या वाशीत वाहतुकीची समस्या गंभीर बनली आहे. त्यातच चालकांच्या बेशिस्तपणामुळे, रस्त्यावर वाहन पार्क करण्याच्या वृत्तीमुळे वाशी परिसरात नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यातच वाशी भागातील प्रदूषणातही वाढ होत आहे. रस्त्यावर गाडी पार्क करण्याचा आपला जन्मसिद्ध अधिकार आहे, या अविर्भावात नवी मुंबईतील नागरिक जागोजागी रस्त्याच्या बाजूला पार्किंग करत आहेत. त्यामुळे वाशीतून एखाद्याला प्रवास करायचा असेल तर त्याला मोठ्या दिव्यातून जावे लागते. 

वाशी रेल्वे स्टेशनच्या बाहेरील रस्त्यावर रिक्षाचालकांमध्ये प्रवासी घेण्यासाठी असलेली चढाओढ वाहतूक कोंडीला निमंत्रण देत आहे. असाच काहीसा प्रकार वाशी हायवेजवळसुद्धा आहे. येथील सिग्नल पडण्याची प्रतीक्षा न करता वाहनचालक गाड्या घुसवत असल्याने अनेकदा या ठिकाणी वाहतुकीचा खोळंबा होतो. रात्रीच्या वेळेस वाशी हायवे उड्डाणपुलाखाली उभ्या रहाणाऱ्या खासगी बस वाहतूकदारांच्या गाड्यांमुळे तर नागरिकांचे प्रचंड हाल होतात. वाशी सेक्‍टर-९ परिसरात असलेल्या मार्केटमधील भाजीपाला विक्रेत्यांना हटवूनही अनधिकृत फेरीवाले त्याच भागात ठाण मांडून असल्यामुळे या भागातून जाताना प्रत्येकाला वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. याशिवाय वाशीतील अग्निशमन दल विभागाच्या सिग्नलपासून ते सेक्‍टर-२६ मधील ब्ल्यू डायमंड चौकापर्यंतचे दीड कि.मी.चे अंतर पार करण्यासाठी १५ मिनिटे लागत आहेत. तर नव्याने विकसित करण्यात आलेल्या सानपाडा नोडमधील सर्व्हिस रोड; तसेच सानपाड्यात निर्माण केलेले रस्ते हे आवश्‍यकतेपेक्षा कमी लेनचे असल्याने या भागातील नागरिकांनादेखील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे.

रहिवाशांकडून रस्त्यावरच पार्किंग
नवी मुंबईत रस्त्यालगत उभ्या असलेल्या बहुतेक इमारतींना पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे सोसायटीत व इमारतीत राहणारे नागरिक रस्त्याच्या एका लेनवर गाडी उभी करण्यात धन्यता मानतात. त्यामुळे जागोजागी रस्त्यावर पार्किंग केली जात असल्यामुळे वाहतुकीसाठी रस्त्यावर एखादीच लेन खुली असते. त्या एका लेनमधून प्रवास करण्याची प्रत्येक वाहनचालकामध्ये चढाओढ लागलेली असते. 

इमारतींमध्ये पार्किंग बंधनकारक
इमारतीचा आराखडा मंजूर करताना त्यातील फ्लॅटमध्ये असलेल्या बेडरूमच्या संख्येइतकी पर्किंगची जागा राखीव असणे बंधनकारक करणे आवश्‍यक असल्याचे वाहतूक विभागाकडून सुचविण्यात आले आहे. त्याशिवाय ठिकठिकाणी ‘पे ॲण्ड पार्क’ विकसित करून पार्किंगची सुविधा माफक दरात उपलब्ध करून देणे, प्रत्येक नोडमध्ये पार्किंग प्लॉट विकसित करणे, आवश्‍यक असल्याचे वाहतूक विभागाकडून सुचविण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Citizens were upset over the problem of traffic in Vashi