शहरी नक्षलवादाच्या नावावर दिशाभूल - प्रकाश आंबेडकर

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 19 एप्रिल 2018

मुंबई - शहरी नक्षलवादाची नवी "थेरी' मांडून मुख्यमंत्री दलित संघटनांकडून उभारल्या जाणाऱ्या आंदोलनाबाबत दिशाभूल करत असल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा गृह विभाग काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबई - शहरी नक्षलवादाची नवी "थेरी' मांडून मुख्यमंत्री दलित संघटनांकडून उभारल्या जाणाऱ्या आंदोलनाबाबत दिशाभूल करत असल्याची टीका भारीप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मार्गदर्शनाखाली राज्याचा गृह विभाग काम करत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला.

मुंबई, पुणे आणि नागपूरमध्ये काल सामाजिक कार्यकर्त्यांच्या घरांवर छापे टाकण्यात आले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी कालचे संपूर्ण छापासत्र ही हुकूमशाही पद्धतीची होती, असा आरोप केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या छाप्यामागे शहरी नक्षलवाद असल्याचे वक्‍तव्य केले होते. त्याचाही समाचार आंबेडकर यांनी घेतला. शहरामधील कामगार संघटनांना मोडीत काढण्यासाठी शहरी नक्षलवाद या "थेरी'चा भविष्यात हे सरकार वापर करणार असल्याची भीती आंबेडकर यांनी व्यक्‍त केली. कामगार संघटनांनी यासाठी सावध असण्याची आवश्‍यकता असल्याचे मत त्यांनी मांडले. नक्षलवादाचा शिक्‍का मारला की कामगार, कार्यकर्त्यांच्या पाठीमागे पोलिस चौकशीचा ससेमिरा लावून त्यांचे संघटन मोडून काढण्याचा हा डाव असल्याचे त्यांनी सांगितले.

या छाप्यांमध्ये कार्यकर्त्यांकडून मिळालेली कागदपत्रे आणि त्यांच्या जप्त केलेले लॅपटॉपमधून जी काही माहिती मिळेल ती पोलिसांनी प्रसिद्ध करावी, असे आवाहनही त्यांनी केले.

भिडेंना वाचविण्यासाठी छापे - आंबेडकर
कोरेगाव भीमा दंगलीमागील मुख्य सूत्रधार संभाजी भिडे यांचे या दंगलीतील पुरावे दलित संघटनांकडून दिले जात असल्यानेच कार्यकर्त्यांवर कारवाई केली जात आहे, तसेच पोलिसांनी गोवंडी येथे कार्यकर्त्यांच्या घरावर छापा टाकला, त्या वेळेस संघाशी संबंधित कृष्णा नावाची व्यक्‍ती त्यांच्यासोबत होती. या व्यक्‍तीच्या सूचनेनुसारच पोलिस कारवाई करत होते, असाही आरोप त्यांनी केला. संभाजी भिडेंना वाचविण्यासाठी हे छापे टाकले जात असल्याचेही ते म्हणाले. जुलैपर्यंत भिडेंना अटक करण्यात आली नाही, तर विधान भवनाला घेराव घातला जाणार असल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: city naxalite prakash ambedkar