कमी किमतीत डॉलर घ्यायला गेले, हातात 'काय' आलं पाहा..

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 14 December 2019

  • अमेरिकन डॉलरच्या प्रलोभनाने फसवणूक करणाऱ्यास अटक 
  • अनेकांना लाखोंचा गंडा घातल्याची शक्‍यता 

नवी मुंबई  : स्वस्तात अमेरिकन डॉलर मिळवून देण्याचे प्रलोभन दाखवून टॅक्‍सीचालक, ओला कारचालकांकडून लाखो रुपयांची फसवणूक करणाऱ्या टोळीतील युसूफ अमिर खान (27) या भामट्याला पकडण्यात तुर्भे MIDC पोलिसांना यश आले आहे. पोलिसांनी त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू केला आहे. या टोळीने नवी मुंबईच्या विविध भागात अनेकांना लाखो रुपयांना गंडा घातला असण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे.

महत्त्वाची बातमी : आधी योग्य मोबदला मगच बुलेट ट्रेन ; शेतकरी झाले आक्रमक

या टोळीने मागच्या आठवड्यात ठाण्यात  राहणाऱ्या राधेश्‍याम यादव (40) आणि पनवेलमध्ये राहणाऱ्या चेतन गायकवाड (36) या दोघांना कमी किमतीत अमेरिकन डॉलर देण्याचे प्रलोभन दाखविले होते. या टोळीने राधेश्‍याम याला 2 लाख रुपये घेऊन महापे MIDC मध्ये, तर चेतन गायकवाड याला वाशीतील जुहूगाव येथे बोलावून दोघांकडून प्रत्येकी 2-2 लाखांची रक्कम लुबाडून त्यांना नोटांच्या आकाराचे कागदी बंडल असलेली पिशवी देऊन पलायन केले होते.

अशी होते फसवणूक : 

या टोळीतील सर्व सदस्य हे पश्‍चिम बंगालमधील असून, ते एकाचवेळी तीन ते चार महिलांसह 12 ते 14 सदस्य मुंबईत दाखल होतात. त्यानंतर भाड्याने घर घेऊन राहतात. या टोळीतील सदस्य हे टॅक्‍सी अथवा ओला-उबेर सारख्या वाहनातून प्रवास करून त्या वाहनचालकाला त्यांच्याजवळ मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलर असल्याचे भासवून ते कमी किमतीत देण्याचे प्रलोभन दाखवितात. तसेच त्यासाठी गिऱ्हाईक शोधण्यासाठी या वाहनचालकाला सांगतात. मात्र, वाहनचालक स्वत:च या टोळीतील सदस्यांच्या प्रलोभनाला बळी पडतात. 

 

याप्रकरणी तुर्भे एमआयडीसी आणि वाशी पोलिस ठाण्यात फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तुर्भे MIDC पोलिस ठाण्यातील सहायक पोलिस निरीक्षक नांद्रे  आणि त्यांचे पथक या प्रकरणातील आरोपींचा शोध घेण्यासाठी तक्रारदार राध्येशाम यादव याच्यासोबत शिळरोड येथील पलावा भागात गेले होते. यावेळी या टोळीतील आरोपी युसूफ अमिर खान हा आरोपी निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.

महत्त्वाची बातमी  : हिवाळी अधिवेशनात मोठा राजकीय भूकंप होणार? 

पोलिसांनी त्याची अधिक चौकशी केल्यानंतर त्याने व त्याच्या साथीदारांनी राध्येशाम याच्याकडून दोन लाखांची रोख रक्कम लुबाडल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. पोलिस आता या गुह्यात सहभागी असलेल्या दोन महिलांसह चौघांचा शोध घेत आहेत. या गुन्ह्यातील इतर आरोपींना अटक झाल्यानंतर त्यांच्याकडून अशाच प्रकारच्या फसवणुकीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येतेय.   

clan from navi mumbai took money in return of pieces of paper caught by cops 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: clan from navi mumbai took money in return of pieces of paper caught by cops