कल्याणमधील नालेसफाईला मुहूर्त कधी? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 8 मे 2018

कल्याण - पावसाळा आला की पालिकेला नालेसफाई आणि रस्ते दुरुस्तीची कामे दिसतात; मात्र वर्षभरात त्या नाल्यात साचलेला कचरा साफ करण्यात पालिका प्रशासनाला वेळ नसल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. एप्रिल महिना संपत आला तरीही पालिकेच्या नालेसफाईला मुहूर्त सापडला नसल्याने यंदा कल्याण परिसरात पाणी तुंबण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

कल्याण पूर्वसहित पालिका हद्दीत मोठे नाले, छोटे नाले आणि गटारांची साफसफाई पावसाळ्यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्चून केली जाते; मात्र पावसाळा सुरू होताच याकडे दुर्लक्ष होत असल्याने अनेक नाल्यात सध्या कचऱ्याचे ढीग साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. कल्याण पूर्वेतील खडगोलवली नाल्यात वर्षभर प्लास्टिक पिशव्यांचा कचरा पडलेला असतो. सध्या या नाल्यात हिरवे गवत उगविलेले असून, नागरिकांनी टाकलेला कचरा वेळेवर उचलला गेला नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे या नाल्यांची सफाई पावसाळ्यापुरती न करता वर्षभर करावी, तसेच कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी माजी उपमहापौर आणि भाजप नगरसेवक विक्रम तरे यांनी केली आहे. 

अशीच परिस्थिती कल्याण पश्‍चिमेतील जरीमरी नाल्याची आहे. प्रतिदिन येथे जमा होणारा कचरा काही अनोळखी व्यक्ती सायंकाळी जाळत असल्याने धूर होतो. यामुळे अनेक वेळा नागरिकांना त्रास होतो. हाच नाला पुढे एसटी डेपोला लागून जात असल्याने या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे. 

नाल्यामधील कचरा प्रश्‍न हा विषय वेगळा विभाग हाताळतो. पावसाळ्यापूर्वीची नालेसफाईबाबत निविदा प्रक्रिया सुरू असून, लवकरच कामाला सुरुवात होईल. 
- बबन बरफ, कार्यकारी अभियंता, पालिका 

Web Title: cleaning of drains in Kalyan