पंतप्रधानांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कल्याण होतेय 'चकाचक'

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्सही जेसीबी लावून काढण्यात येत आहेत. 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी कल्याण मेट्रोच्या पाचव्या मार्गाचे तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत आहेत.

कल्याण : पंतप्रधान नरेंद्र मोदी कल्याण नगरीत येणार आहेत. त्यासाठी सभास्थानांची तसेच ते ज्या मार्गावरून येणार आहेत, त्या ठिकाणाची साफसफाई करण्यास कल्याण-डोंबिवली महापालिकेने सुरवात केली आहे. मोदींच्या ताफ्याला स्पीड ब्रेकरचाही अडथळा येऊ नये, यासाठी आधारवाडी चौकातून बापगावकडे जाणाऱ्या रस्त्यावरील स्पीड ब्रेकर्सही जेसीबी लावून काढण्यात येत आहेत. 18 डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी कल्याण मेट्रोच्या पाचव्या मार्गाचे तसेच पंतप्रधान आवास योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमासाठी येत आहेत.

पंतप्रधानांची सभा लाल चौकीजवळील वासुदेव बळवंत फडके मैदानावर होणार आहे. दुपारी दोनच्या सुमारास ही सभा होईल. सभेस येणाऱ्या नागरिकांना उन्हाच्या झळा बसू नयेत, यासाठी मोठा सभामंडप तसेच व्यासपीठ उभारण्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचबरोबर कल्याणपासून तीन किलोमीटरवरील बापगाव परिसरातील मैदानावर पंतप्रधानांचे तसेच त्यांच्या सुरक्षारक्षकांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे. तेथून गाडीने पंतप्रधान सभास्थानी पोहोचतील. या मार्गावरुन पंतप्रधानांच्या ताफ्याचा प्रवास सुखकर आणि सुकर व्हावा यासाठी येथील रस्त्यांची डागडुजी करण्यात येत आहे. या मार्गावर असलेले स्पीडब्रेकर आज जेसीबी लावून काढण्यात आले. पंतप्रधानांचा ताफा ज्या रस्त्यावरून मार्गक्रमण करणार आहे. त्या रस्त्यावर स्पीडब्रेकर नसावेत अशा सूचना पंतप्रधानांच्या विशेष पथकाने दिल्या आहेत. त्यानुसार या मार्गावरील दोन्ही बाजूकडील जवळपास 25 ते 30 स्पीडब्रेकर्स काढावे लागणार आहेत. कार्यक्रम झाल्यानंतर पुन्हा या ठिकाणी स्पीडब्रेकरचे काम केले जाईल, असे पालिकेचे कार्यकारी अभियंता रघुवीर शेळके यांनी सांगितले. त्याचप्रमाणे दुतर्फा असलेल्या दुकानांचे अतिक्रमणे काढण्याची कारवाईही धूम धडाक्यात सुरू झाली आहे. 

ज्या फडके मैदानावर सभा होणार आहे, त्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी मुंबई महानगर प्रदेश प्राधिकरणाकडे आहे. या ठिकाणी भव्य असे व्यासपीठ त्याचप्रमाणे सभामंडपाचे काम सुरू करण्यात आले आहे. या कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे. भिवंडी कल्याण मेट्रो पाचव्या मार्गीकेचे भूमिपूजन तसेच सिडकोमार्फत तळोजा, द्रोणागिरी परिसरात बांधण्यात येणाऱ्या पंतप्रधान आवास योजनेचे भूमिपूजन असे दोन कार्यक्रम या ठिकाणी होणार आहेत. त्यानंतर पंतप्रधान मोदी यांची जाहीर सभा होणार आहे.

पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर प्रथमच पंतप्रधान नागरिकांना संबोधित करणार असल्यामुळे या सभेबाबत पक्षात तसेच नागरिकांमध्ये ही उत्सुकता आहे. पंतप्रधानांच्या दौऱ्याबाबत सुरक्षा यंत्रणाकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. ज्या बापगाव येथील मैदानात पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर उतरणार आहे, त्या परिसरातील विजेच्या खांबावरील वितरण वाहिन्या जमिनीखालून घेण्याचे काम सुरु करण्यात आले आहे.  

मागील काही दिवसांत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरला अनेक अडथळे आल्याच्या घटना घडल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या मैदानावर दोन हेलिपॅड तयार करण्यात येत आहेत. परिसरातील साफसफाईकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

Web Title: Cleaning started in Kalyan Due to visit of Prime Minister Modi