उरणमध्ये स्वच्छतेचा बोजवारा

सकाळ वृत्‍तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

उरण ः लाल मैदान येथे टाकण्यात आलेला कचरा. 

उरण : संपूर्ण भारतभर स्वच्छता अभियान राबलेल जात असताना उरण नगरपालिकेकडून स्वच्छतेचा बोजवारा उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. जागोजागी पडलेला कचरा, प्लास्टिकचा बेसुमार वापर यावरून उरण नगरपालिकेने शहरात स्वच्छतेसंदर्भात केवळ बॅनरबाजी करून जनतेच्या लाखो रुपयांचा चुराडा केला असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. कचऱ्यामुळे शहरात दुर्गंधी पसरल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढून रोगराईही पसरत आहे. त्यामुळे नगरपालिका जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत असल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे.

उरणच्या लाल मैदानात रविवारचा आठवडा बाजार भरला जातो. या बाजारात वेगवेगळ्या प्रकारची दुकाने थाटली जातात; मात्र बाजारानंतर मैदानात कचऱ्याचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात पसरले आहे. त्यातच प्लास्टिक बंदी असताना प्लास्टिक कचरा मोठ्या प्रमाणात मैदानातच फेकला जातो; मात्र या दुकानदारांकडून कर वसूल करणारी नगरपालिका कचरा उचलण्याकडे डोळेझाक करत आहे. तसेच उरण शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान (लाल मैदान) खेळासाठी आरक्षित असतानाही दर रविवारी आठवडा बाजार भरत असल्याने सुट्टीच्या दिवशी खेळाचा आनंद घेणाऱ्या मुलांना खेळता येत नाही.

डम्पिंग ग्राऊंडजवळ कचऱ्याच्या गाड्या अडविल्याने कर्मचारी कचरा उचलू शकले नाहीत. आता कचरा उचलण्याचे काम सुरू आहे. 
- सायली म्हात्रे, नगराध्यक्षा 

नगरपालिका फक्त हप्ते वसुली करण्याकडे लक्ष देत आहे. कचरा उचलण्याकडे नाही. परिसरात होणाऱ्या कचऱ्यामुळे मोठी दुर्गंधी पसरत आहे. पालिका शहरातील आणि तालुक्‍यातील जनतेच्या आरोग्याशी खेळ करीत आहे. 
- सीमा घरत, शेकाप महिला आघाडी अध्यक्ष, उरण 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cleanliness in the Uran