कामाठीपुरा बंद करा! स्थानिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; संसर्ग वाढण्याची भीती

कामाठीपुरा बंद करा! स्थानिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र; संसर्ग वाढण्याची भीती


मुंबई: कामाठीपुरा येथील वेश्याव्यवसाय बंद करण्यासाठी स्थानिकांनी प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली असून त्यात 700 रहिवाशांनी भाग घेतला आहे. मात्र, हा एक प्रकारचा भेदभाव असल्याचे सांगत काही सामाजिक संघटनांनी यास विरोध केला आहे. 

कामाठीपुऱ्यात जवळपास एक हजार नागरिकांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच पालिका आयुक्त इकबाल चहल यांना पत्र लिहिले आहे. पत्रात त्यांनी कामाठीपुरा पुन्हा सुरू करण्यास विरोध केला आहे. कामाठीपुऱ्यात दिवसाला हजारो लोक येतात. त्यामुळे संपूर्ण परिसरात संसर्ग पसरण्याची भीती रहिवाशांनी व्यक्त केली आहे. कामाठीपुऱ्यात आल्यानंतर अनेक लोक येथील दुकानांवर जातात व ठिकठिकाणी गर्दी करतात. त्यानंतर ही लोक शहरांतील अनेक भागांत जातात. त्यामुळे संपूर्ण शहरात संसर्ग पसरण्याचा धोका असल्याचे पत्रात नमूद केले आहे. 
काँग्रेसचे स्थानिक आमदार आमीन पटेल आणि नगरसेवक अतुल शहा यांनी मात्र, रहिवाशांच्या मागणीबाबत अनभिज्ञ असल्याचे सांगितले आहे. याबाबत माहिती घेऊन आपण राहिवाशांशी चर्चा करू. तसेच, याबाबत त्यांचे गैरसमज दुर करू, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

आपल्या मागणीसाठी रहिवाशांनी जूनमध्ये प्रसिद्ध झालेला हाॅवर्ड मेडिकल स्कुल आणि याले स्कुल ओढ मेडिसीन यांच्या अहवालाचा आधार घेतला आहे. एखाद्या शहरातील रेड लाईट परिसर सुरू केल्यास पुढे 4 लाख लोक बाधित होणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. या संशोधनात 12 हजार रेड लाईट परिसरांचा अभ्यास करण्यात आला होता. परिसरातील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते रुकेश गिरोला यांनी यासाठी पुढाकार घेतला. मात्र, प्रशासनाकडून पत्राला सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. याबाबत पोलिसांशीही संपर्क साधला. मात्र, त्यांनीही यावर काहीही कार्यवाही केली नसल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी स्थानिकांसोबत काही मंडळांनीही गणेशोत्सवादरम्यान पोस्टर मोहिम राबविली होती. गणेश पंडालांसह संपूर्ण कामाठीपुरा परिसरात 250 पोस्टर लावण्यात आले होते. त्यात रेडलाईट परिसरात येणाऱ्या लोकांना विरोध करण्यात आला होता. 

कामाठीपुऱ्यातील या मोहिमेला काही सामाजिक कार्यकर्त्यांनी मात्र, विरोध केला आहे. अशा मोहिमांमुळे पुन्हा एकदा रेड लाईट परिसरात व्यवसाय करणाऱ्या महिलांचाच बळी जाणार असल्याचे प्रेरणा संस्थेच्या प्रमुख प्रीती पाटकर यांनी सांगितले. 
रहिवाशांच्या मागणीला काहीही शास्त्रीय आधार नाही. वेश्यांमुळे संसर्ग वाढत असल्याचे सिद्ध झालेले नाही. सरकारला पत्र लिहिण्याऐवजी स्थानिकांनी एकत्र येऊन चर्चा करावी आणि त्यातून मार्ग काढावा, असे पाटकर म्हणाल्या. 

महिलांचे पुनर्वसन करावे
आतापर्यंत कामाठीपुरा, ग्रांट रोड तसेच फॉकलांड रोड येथे 3,494 रुग्ण तर, 114 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे रेड लाईट परिसरात इतर व्यक्तींना येण्यास बंदी घालावी, अशी रहिवाशांची मागणी आहे. तसेच, वैश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचे पुनर्वसन करून करून त्यांच्या रोजगाराची व्यवस्था करावी, असेही रहिवाशांचे म्हणणे आहे. 

कामाठीपुऱ्यातील परिस्थितीची अनेकांना माहीत नाही. या परिसरात संसर्ग होण्याच्या भीतीने रहिवासी जीव मुठीत घेऊन जगत आहेत. 
त्यामुळे कामाठीपुऱ्यातील वैश्या व्यवसाय बंद करण्याबाबत न्यायालयात याचिका दाखल करण्याचा विचार देखील सुरू आहे. याशिवाय व्हाट्स अॅप तसेच मोबाईल संदेशाच्या माध्यमातूनही जनजागृती सुरु आहे. 
- सुरेश पब्बा,
सामाजिक कार्यकर्ते.


मोहिम भेदभाव करणारी
रहिवाशांची मोहीम भेदभाव करणारी असून यातून वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची अधिक कुचंबणा होणार आहे. असे केल्यास या महिलांसमोर जगण्या-मारण्याचा प्रश्न उभा राहील. त्यांच्या जगण्याचा अधिकार हिरावण्याचा कुणालाही अधिकार नाही. यापेक्षा त्यांच्या जगण्याची वेगळी व्यवस्था उभी करणे महत्वाचे असल्याचे खुशी समाजाईक संस्थेचे संस्थापक मन्सूर पटेल यांनी सांगितले.

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com