
रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पिडीत कुटुंबाशी दुरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला असून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
अलिबाग : रोहा तालुक्यातील तांबडी येथील पीडीत मुलीला न्याय मिळावा यासाठी ग्रामस्थांनी केलेल्या ठिय्या आंदोलनाची मुख्यमंत्र्यांनी दखल घेत पिडीत कुटुंबाशी दुरचित्रसंवादाद्वारे संवाद साधला असून सर्व मागण्या मान्य केल्या आहेत.
राज्य सरकारने या प्रकरणात ज्येष्ठ वकील उज्वल निकम यांची 27 ऑगस्ट रोजी नेमणूक केली असून आरोपींच्या विरोधात आठ दिवसांत चार्जशीट दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. मराठा समाज समन्वयक राजन घाग यांनी जनभावना मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये पीडीत मुलीचे वडील व कुटुंबिय तसेच घोसाळे सरपंच प्रतिभा पार्टे, वाली सरपंच उद्देश देवघरकर यांनी स्थानिकांच्या वतीने तर शासनाच्या वतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख, पालकमंत्री आदिती तटकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, रायगड पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी सहभाग घेतला होता.
सुमारे 40 मिनिटे चाललेल्या या चर्चेत पीडितेचे कुटुंबिय व इतर प्रतिनिधी यांनी केलेल्या बहुतांश मागण्या मान्य करण्यात आल्या असल्याची माहिती चंद्रकांत पार्टे यांनी दिली आहे. पंचक्रोशीतील ग्रामस्थांच्या मागण्यांची मुख्यमंत्र्यांनी तातडीने दखल घेतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
--------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)