esakal | 'त्या' वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांंविरोधात गुन्हा नोंदवा- अतुल भातखळकर
sakal

बोलून बातमी शोधा

अतुल भातखळकर

'त्या' वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांंविरोधात गुन्हा नोंदवा- अतुल भातखळकर

sakal_logo
By
कृष्ण जोशी

मुंबई : यापुढे परप्रांतीय कुठून येतात, कोठे जातात याचा हिशोब ठेवावा लागेल, असे वक्तव्य करणारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav Thackeray) यांच्याविरोधात भाजप (BJP) नेते आमदार अतुल भातखळकर (Atul bhatkhalkar) यांनी समतानगर पोलिस (samta nagar police station) ठाण्यात तक्रार (police complaint) नोंदविली आहे.

हेही वाचा: उल्हासनगर: मोटारसायकल अपघातात जखमी झालेल्या इशिता गौतमचा मृत्यू

मुख्यमंत्र्यांनी वरील वक्तव्याद्वारे परप्रांतीय हे जणू बलात्कारीच आहेत, असे चित्र उभे करून सामाजिक तेढ निर्माण केली असल्याचे भातखळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे. हे वक्तव्य करणाऱ्या मुख्यमंत्र्यांविरुद्ध भारतीय दंडसंहितेच्या कलम 153 अ नुसार गुन्हा नोंदवावा. तसेच या वक्तव्याला प्रसिद्धी देणाऱ्या सामना वृत्तपत्राच्या संपादक श्रीमती रश्मी उद्धव ठाकरे तसेच कार्यकारी संपादक संजय राऊत यांच्याविरुद्धही गुन्हा नोंदवावा, असेही भातखळकर यांनी तक्रारअर्जात म्हटले आहे.

साकीनाका बलात्कार प्रकरणाच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परप्रातीयांना आरोपींच्या पिंजऱ्यात उभे करताना वरील विधान केल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल न केल्यास न्यायालयात दाद मागण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी प्रयत्न करण्याचे सोडून ठाकरे सरकार वसुली करण्यात मग्न आहे.

हेही वाचा: टेंभी पाडा : गणेशोत्सवात फाईट अगेंस्ट कोरोना लक्षवेधक चलचित्र

राज्यात दिवसागणिक बलात्कार व महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. ठाकरे सरकारमधील मंत्री व नेतेच बलात्कारी असल्याचे सिद्ध झाले आहे. तरीही मुख्यमंत्री मात्र परप्रांतीय नागरिकांना लक्ष करीत आहेत. शिवसेनेचे माजी मंत्री संजय राठोड, नगरसेवक नामदेव भगत, शिवसेनेचे माजी आमदार दिलीप माने, नालासोपाऱ्याचा शिवसेना नगरसेवक धनंजय गावडे यांच्यावर महिलांवरील अत्याचाराचे आरोप झाले आहेत. हे सर्व शिवसेनेचे नेते परप्रांतीय आहेत का ? असा सवालही भातखळकर यांनी केला आहे.

मागील सात महिन्यांत एकट्या मुंबई शहरात साडेपाचशे महिला विकृत वासनेच्या शिकार ठरल्या आहेत. धक्कादायक म्हणजे यात तब्बल 323 अल्पवयीन मुली सुद्धा आहेत. यातील किती आरोपी परप्रांतीय आहेत याचा हिशोब मुख्यमंत्र्यांनी द्यावा अशीही मागणी भातखळकर यांनी केली आहे. पुढील चार दिवसांत मुख्यमंत्र्यावर गुन्हा दाखल न झाल्यास न्यायालयात दाद मागणार असल्याचा इशारा भातखळकर यांनी दिला आहे.

loading image
go to top