महिलेच्या पोटात कोकेन अन्‌ कंडोम!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 मार्च 2020

मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या बोलिव्हियातील महिलेच्या पोटातून कोकेन भरलेले १३ कंडोम काढण्यात आले. या सुमारे ३०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी रुपये आहे. 

मुंबई : मुंबई विमानतळावरून अटक करण्यात आलेल्या बोलिव्हियातील महिलेच्या पोटातून कोकेन भरलेले १३ कंडोम काढण्यात आले. या सुमारे ३०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी रुपये आहे. महसूल गुप्तवार्ता संचालनालयाने (डीआरआय) या महिलेला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

ही बातमी वाचली का? धावत्या लोकलवर फुगे फेकल्यास होणार कारवाई!

डीआरआयने या बोलिव्हियन महिलेला कोकेनसह शुक्रवारी अटक केली. रिबेरा अनेज डिलिसिया (५४) ही महिला ब्राझीलमधील साओ पावलो येथून आदिस अबाबामार्गे २ मार्चला मुंबई विमानतळावर आली होती. डीआरआयने दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी या महिलेला ताब्यात घेण्यात आले. तिच्या पोटात कोकेन असल्याचा संशय अधिकाऱ्यांना होता. त्यामुळे जे. जे. रुग्णालयात तिचा एक्‍स-रे काढण्यात आला व सोनोग्राफी करण्यात आली. त्या वेळी तिच्या पोटात कॅप्सूलसारख्या वस्तू असल्याचे आढळले.

ही बातमी वाचली का? पालघरमध्ये अवकाळी पाऊस

त्यानंतर डॉक्‍टरांनी तिच्या पोटातून १३ कंडोम बाहेर काढले. त्यांत कोकेन असल्याचे निष्पन्न झाले. त्यासाठी डॉक्‍टरांना दोन दिवस प्रयत्न करावे लागले. कंडोममध्ये लपवलेल्या ३०० ग्रॅम कोकेनची किंमत एक कोटी रुपये असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ब्राझीलमधील अमली पदार्थ तस्कराने पाठवलेले हे कोकेन तिला मुंबईतील सांताक्रूझ येथील दोन नायजेरियन नागरिकांपर्यंत पोहोचवायचे होते. अमली पदार्थ पोहोचवण्यासाठी तिला मुंबई किंवा मकाऊ असे पर्याय देण्यात आले होते. त्यानुसार एक दिवस आधी कोकेन भरलेले १३ कंडोम गिळून ती मुंबईत आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cocaine and condom in woman's stomach!