नागरिकांची दिशाभूल टाळण्यासाठी कोव्हिड जाहिरातींबाबत आचारसंहिता जारी

नागरिकांची दिशाभूल टाळण्यासाठी कोव्हिड जाहिरातींबाबत आचारसंहिता जारी

मुंबई ः कोरोनावरील उपचार आणि त्याला प्रतिबंधासंदर्भात जाहिरातींमध्ये दिशाभूल करणारे दावे असू नयेत म्हणून ऍडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडियातर्फे मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. नागरिकांची दिशाभूल करणाऱ्या जाहिराती येऊ नयेत यासाठीच्या आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे म्हणून ही मार्गदर्शक तत्त्वे आहेत. 

जाहिरातींमुळे वस्तुस्थितीचा विपर्यास होऊ नये, ग्राहकांची दिशाभूल होऊ नये तसेच त्यांच्या अननुभवीपणाचा फायदा घेतला जाऊ नये हे आचारसंहिता जाहीर करण्यामागील मुख्य हेतू आहेत. ऍडव्हर्टायझिंग स्टॅण्डर्ड कौन्सिल ऑफ इंडिया ही प्रसारमाध्यमांद्वारा प्रसारित होणाऱ्या जाहिरातींवर लक्ष व नियंत्रण ठेवणारी सरकारी मान्यताप्राप्त संस्था आहे. 

ड्रग्ज ऍण्ड कॉस्मेटिक ऍक्‍टअंतर्गत परवान्याची आवश्‍यकता नसलेल्या उत्पादनांसंदर्भात कोव्हिडवर उपचार करण्याचे दावे करताना विशेष काळजी घ्यावी. त्यासाठीही वरीलप्रमाणे आवश्‍यक मान्यता असावी, असेही कौन्सिलच्या मार्गदर्शक तत्त्वात म्हटले आहे. कोरोना काळातील ग्राहकांच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी अनेक उत्पादने बाजारात आली आहेत; मात्र त्यांच्या जाहिरातीत केलेल्या दाव्यांना पुरेसे व समर्थनीय पाठबळ असावे. त्यायोगे ग्राहकांची सुरक्षितता तसेच जाहिरातींचा दर्जा पाळला जावा. जाहिरातदार, जीव-रसायन शास्त्रज्ञ, आयुर्वेद, आहारतज्ज्ञ आदी विषयांमधील तज्ज्ञांशी सल्लामसलत करून मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्यात आली आहेत, असे एएससीआयच्या महासचिव मनीषा कपूर म्हणाल्या. 

आयुष मंत्रालयाच्या निर्देशांनुसार कोव्हिडसंदर्भात दिशाभूल करणारे दावे असलेल्या 500 हून अधिक जाहिरातींची कौन्सिलने तपासणी केली. त्यासंदर्भात कौन्सिलने तपास प्रलंबित असेपर्यंत जाहिरातीचे प्रसारण तहकूब ठेवण्याचा पर्यायही वापरला. 

कौन्सिलने केलेल्या सूचना 
- जाहिरातीमध्ये कोरोनाव्यतिरिक्त इतर विषाणूंचा नाश करण्याचा दावा असल्यास तो कोव्हिड 19 साठी लागू नाही असे स्पष्ट करावे. 
- आपल्या उत्पादनांमुळे कोव्हिड 19 ची लागण होण्याची शक्‍यता कमी आहे किंवा त्यामुळे कोरोना विषाणूविरोधातील रोगप्रतिकारशक्ती वाढेल असे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष दावे करताना विशेष काळजी घ्यावी. 
- डब्ल्यूएचओ, आयसीएमआर, एमओएचएफडब्ल्यू, आयुष, डीसीजीआय, सीडीसी (अमेरिका) आदी आरोग्य प्राधिकरणे किंवा त्याच दर्जाच्या आरोग्य संस्थांद्वारे किंवा मान्यताप्राप्त वैद्यकीय संस्थांनी संशोधनाअंती असे दावे केले असतील तरच जाहिरातदार त्यानुसार दावा करू शकतील. 

Code of Conduct on Covid Advertising issued to avoid misleading citizens
--------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com