बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास; दुर्लक्ष न करण्याचा सल्ला

शरद वागदरे
Saturday, 3 October 2020

लहान मुलांना अधिक त्रास; रुग्णांचे प्रमाणही वाढले

वाशी, ता. 3 : ऋतू बदलल्याने नवी मुंबईत सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले यामुळे त्रस्त आहेत. सर्दी- खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी दुर्लक्ष करणे घातक ठरू शकते. त्यामुळे वेळीच उपचार करावेत, असा सल्ला डाॅक्टरांनी दिला आहे. 

सर्दी, खोकला, कणकण, घसा खवखवणे या सिझनल अ‍ॅलर्जींंना वैद्याकीय भाषेत 'हायनायिटज' म्हणतात. या आजाराच्या रुग्णांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे. नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या गंभीर आजाराचीही चाहूल असू शकते. त्यामुळे वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे मत  डॉ. मंगेश वास्के यांनी व्यक्त केले आहे.

अल्पवयीन मुलांविरोधातील गुन्ह्यांत मुंबई दुसऱ्या स्थानी!

ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून ऊन पावसाचा खेळ सुरु असल्यापासून या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. ऋतू बदलतो, त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोक वर काढतात. लहान मुले. वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती चांगली नसल्याने याचा जास्त त्रास होतो. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीत जास्त गरम पाणी प्यावे. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा, प्रवास करीत असताना मास्क,रुमाल व स्कार्पचा वापर करावा. याबरोबरच दररोज व्यायाम करावा असे त्यांनी सांगितले.

उन्हाळा व पावसाळयात पालिका रुग्णालयांच्या ओपीडीमध्ये येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाण हे कमी होते. मात्र, आता ऑक्टोबर महिना सुरु झाल्यांनतर ऊन व पावसाचे वातावरण सुरु आहे. यामुळे पालिकेतील या रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे नवी मुंबई महापालिकेचे डॉ. सुरेश कुभार यांनी सांगितले. 

दररोजचे 10 ते 15 रुग्ण
गेल्या काही दिवसांपासून सकाळी वाढणारे तापमान तर, काही वेळानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल होत आहे. त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी असलेले 10 ते 15 रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येते आहेत, असे डॉ. शाम यादव यांनी सांगितले.

पर्यावरण प्रेमींनी केलं निर्णयाचं स्वागत, मुंबईतील कांदळवनांचं कवच वाढणार

(संपादन - अनिल जमधडे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold, coughing due to changing climate in navi mumbai