नायर रुग्णालयात कोल्ड स्टोरेजची व्यवस्था, चाचण्यांचे नमुने साठवले जाणार

मिलिंद तांबे
Friday, 11 September 2020

कोविड 19 च्या लसीकरणासाठी विविध चाचण्या नायर हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत. चाचण्यांचे नमुने आणि  लस साठवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे.

मुंबई: पालिकेच्या नायर रुग्णालयात अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजची व्यवस्था केली जातेय. यात नवी लस शोधण्यासाठी आवश्यक चाचण्यांचे नमुने साठवले जाणार आहेत. यासाठी युरोपियन कंपनीने पालिकेला मदतीचा हात दिला असून त्यांच्या मदतीने हे कोल्ड स्टोरेज उभारले जात आहे.

कोविड 19 च्या लसीकरणासाठी विविध चाचण्या नायर हॉस्पिटलमध्ये केल्या जाणार आहेत. चाचण्यांचे नमुने आणि  लस साठवून ठेवण्यासाठी अत्याधुनिक कोल्ड स्टोरेजची गरज लागणार आहे. लस शोधण्याच्या आणि वापरण्याच्या प्रक्रियेत त्याचे तापमान हे अत्यंत संवेदनशील असल्याने त्यांच्या संचयनास सतत रेफ्रिजरेशन आवश्यक असते. जर बनविलेल्या लशींची  साठवण तापमानाच्या श्रेणीबाहेर ठेवली गेली तर ती लस  कुचकामी आणि असुरक्षित ठरू शकते.

हा धोका टाळण्यासाठी जगातील अग्रगण्य कोल्ड चेन उपकरण बनविणाऱ्या बी- मेडिकल सिस्टमने  मुंबईला मदतीचा हात देऊ केला आहे. कोरोना संकटकाळामध्ये मुंबई महापालिका क्षेत्रातील आरोग्य सेवेच्या पायाभूत सुविधा अधिक बळकट करण्यासाठी युरोपातील लस कोल्ड चेन उपकरण उद्योगातील अग्रगण्य बी -मेडिकल सिस्टिम या कंपनी तर्फे मुंबईतील नायर चॅरिटेबल हॉस्पिटलला कोरोना लसीच्या साठवणुकीसाठी एक कोल्ड स्टोरेज आधुनिक उपकरण मोफत देण्यात येणार आहे.

 बीवायएल नायर रुग्णालयात देशभरातून अनेक सर्वसामान्य रूग्ण उपचारांसाठी येतात. एप्रिल 2020 मध्ये, नायर चॅरिटेबल हॉस्पिटलने कोरोना रुग्णांसाठी एकूण 1043 बेड्ची सुविधा पुरवली असून आजपर्यंत हजारो रुग्णांवर यशस्वी उपचार झाले आहेत. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला इंडियन काउंसिल फॉर मेडिकल रिसर्चने ऑक्सफोर्ड-अ‍ॅस्ट्रॅजेनेका तसेच भारतातील सिरम इन्स्टिटयूटने बनविलेल्या कोरोना लशीची पॅन-इंडिया क्लिनिकल चाचण्या घेण्यास नायर हॉस्पिटलला परवानगी दिली आहे.

गेली चार दशके ही कंपनी संशोधन झालेली लस टिकवून ठेवण्यासाठी शीतसाखळी उपकरणे बनवत असून या उपयुक्त लसींची साठवण आणि वाहतुकीसाठी आधुनिक आणि नवीन उपायांवर संशोधन करत आहे. कोरोना संकट काळात सरकारसह पालिका आपल्या स्तरावर या संकटाचा सामना करत आहे. तर भारतात सुरू असलेल्या कोरोनावरील लसींची चाचणी करत आहे. मात्र यासाठी कोल्ड स्टोरेजची नितांत आवश्यकता असून सामाजिक जाणीवेतून आपण पालिकेला कोल्ड स्टोरेज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे बी मेडिकल सिस्टिमचे डेप्युटी सीईओ जेसल दोषी यांनी सांगितले.

(संपादनः पूजा विचारे) 

Cold storage facility test samples will be stored Nair Hospital


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cold storage facility test samples will be stored Nair Hospital