थंडीतील सहलीसाठी ब्रॅण्डी आणा!

MKES-College
MKES-College

मुंबई - विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी शौचालयाचा वापर करण्यास विरोध केल्याने चर्चेत आलेले मालाड येथील एमकेईएस विधी महाविद्यालय पुन्हा नव्या वादात सापडले आहे. महाविद्यालय विद्यार्थ्यांची औद्योगिक सहल नैनितालला नेणार आहे. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात थंडी असल्याने विद्यार्थ्यांनी सोबत ब्रॅण्डी आणावी, असा अजब सल्ला महाविद्यालयाने दिला आहे. महाविद्यालयाचा सल्ला संतापजनक असल्याचा आरोप करीत स्टुडंट लॉ कौन्सिलने महाविद्यालयावर कारवाईची मागणी कुलगुरूंकडे केली आहे. परंतु, हा आरोप महाविद्यालय प्रशासनाने फेटाळून लावला आहे. 

एमकेईएस महाविद्यालयाची ही नैनिताल सहल १२ ते १८ फेब्रुवारीदरम्यान जाणार आहे. तेथे दारू प्यायल्यास थंडीपासून संरक्षण होण्यास मदत होईल, असा सल्ला प्राचार्यांनी दिला. सहलीमध्ये मद्य आणण्याबाबत प्रत्यक्षात प्राचार्यांकडूनच सांगण्यात आल्याने विद्यार्थिनींना धक्काच बसला. याबाबत महाविद्यालयाच्या विश्‍वस्तांकडे तक्रार घेऊन गेल्यावर त्यांनीही प्राचार्यांचा सल्ला योग्य असून, त्याची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे. 

महाविद्यालयाच्या प्राचार्य व विश्‍वस्तांनी विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षण करण्यासाठी दारू सोबत घेण्याचा सल्ला देणे हा प्रकार शिक्षण व्यवस्थेला हरताळ फासणारा आहे. शिक्षकांनीच विद्यार्थ्यांना दारू प्यायला सांगणे हे धक्कादायक आहे, असे स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष ॲड्‌. पवार यांनी सांगितले. याबाबत त्यांनी एमकेईएस महाविद्यालयावर कारवाई करावी, अशी मागणी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे केली आहे.

विद्यार्थ्यांना आम्ही अशा कोणत्याही सूचना दिलेल्या नाहीत. प्राचार्यांनी दारू आणण्यास सांगितल्याप्रकरणी कोणतीही विद्यार्थिनी माझ्याकडे तक्रार घेऊन आलेली नाही. आमची बदनामी करण्याचा हा प्रकार आहे. 
- एन्सी जोस, संस्था संचालक, एमकेईएस महाविद्यालय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com