Mumbai Weather Update : थंडीपासून दिलासा नाहीच; पुढील दोन दिवस थंडीचा जोर राहणार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cold weather for next two days in mumbai weather update forecast maharashtra

Mumbai Weather Update : थंडीपासून दिलासा नाहीच; पुढील दोन दिवस थंडीचा जोर राहणार

मुंबई : बोचऱ्या थंडीला कंटाळलेल्यांना आणखी काही दिवस थांडीचा सामना करावा लागू शकतो.मुंबईतील थंडीचा मुक्काम आणखी काही दिवस वाढू शकतो. हवामानातील सततच्या बदलामुळे ही परिस्थिती आली आहे.यंदाच्या मोसमात पावसाळा देखील काहीसा लांबल्याने हिवाळी हंगामापर्यंत पाऊस सुरू होता,त्यामुळे यंदाचा हिवाळा बराच काळ सुरू राहील असा अंदाज आहे.

महाराष्ट्रात सध्या थंडीपासून फारसा दिलासा नाही. नाशिक, जळगाव, विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी या कालावधीत मराठवाडा, विदर्भ आणि लगतच्या भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच २५ जानेवारीपासून ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी ट्विट करून ही माहिती दिली.

अनेक राज्यात थंडी पडत आहे. काही राज्यांमध्ये तापमान १५ अंशांच्या खाली गेले आहे, तर काही भागात ढगाळ वातावरण आहे. महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान १० अंश सेल्सिअस पर्यंत आहे. जे आणखी खाली जाण्याची शक्यता आहे.

राज्याच्या वातावरणात चढ-उतारांचा खेळ अखंड सुरू आहे. तसेच मराठवाडा आणि विदर्भात पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. यासोबतच येत्या काही दिवसांत दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पावसाची शक्यता ही वर्तवण्यात आली आहे.

राज्यभरात सोमवार पासून पुन्हा एकदा कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. पुढील आठवड्यापासून उत्तर भारतातील बहुतांश भागात पाऊस आणि डोंगराळ भागात बर्फवृष्टीचा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे. उत्तर प्रदेशातील काही भागात पावसामुळे तापमानात घट झाली आहे. २३ जानेवारीपासून उत्तर भारतात पुन्हा एकदा थंडीची लाट येण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, अफगाणिस्तान आणि शेजारच्या भागावर चक्रीवादळाच्या रूपात वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि उत्तर प्रदेशमध्ये सोमवारी हलक्या पावसाची शक्यता आहे.

तर काही ठिकाणी पाऊस झाला आहे. यानंतर २४ ते २७ जानेवारी दरम्यान दिल्लीत मेघगर्जनेसह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर राजस्थान आणि मध्य प्रदेशात २५-२७ जानेवारी दरम्यान हलका पाऊस किंवा गडगडाट होण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाकडून मिळालेल्या आजच्या आकडेवारीनुसार, सातारा १३.३, जळगाव १३.५, ठाणे बेलापूर १६.८, सोलापूर १५.८, कोल्हापूर १६.३, नाशिक १२.२, पुणे ११.५, सांताक्रूझ १७, कुलाबा १९.०२ अंश सेल्सियस किमान तापमानाची नोंद झाली आहे.