विद्यार्थिसंख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकांची तपासणी बंधनकारक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 2 एप्रिल 2019

मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे (उन्हाळी सत्र) निकाल वेळेत लावण्यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थिसंख्येच्या कमीत कमी दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे.

मुंबई - मुंबई विद्यापीठाने प्रथम सत्र परीक्षेचे (उन्हाळी सत्र) निकाल वेळेत लावण्यासाठी महाविद्यालयांना विद्यार्थिसंख्येच्या कमीत कमी दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. विद्यापीठाकडून आवश्‍यक असलेल्या परवानग्या मिळवण्यासाठी महाविद्यालयांना दीडपट मूल्यांकनाचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. हे प्रमाणपत्र परीक्षा विभागाकडून देण्यात येणार असल्याने उत्तरपत्रिका तपासणीत कामचुकारपणा करणाऱ्या महाविद्यालयांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. 

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियमातील (2016) कलम 89 अन्वये परीक्षांचे निकाल निर्धारित वेळेत जाहीर करणे विद्यापीठांवर बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे कलम 48 (4) नुसार विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयाला तेथील अध्यापक व अध्यापकेतर कर्मचाऱ्यांना विद्यापीठाचे परीक्षा व उत्तरपत्रिकेचे मूल्यमापन या बाबतच्या नियमाप्रमाणे मदत करणे व सेवा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही काही महाविद्यालये उत्तरपत्रिकांच्या मूल्यांकनाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळले होते. या महाविद्यालयांना दणका देण्याचा निर्णय मुंबई विद्यापीठाने घेतला असून, प्रत्येक विद्यार्थिसंख्येच्या दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करणे आवश्‍यक केले आहे. 

मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या आहेत. बीकॉमच्या सत्र 6 ची परीक्षा 3 एप्रिलपासून सुरू होत आहे. या सत्रातील परीक्षांचे निकाल वेळेवर जाहीर करण्याचा विद्यापीठाचा प्रयत्न आहे. महाविद्यालयांनी प्रत्येक परीक्षेसाठी तपासलेल्या उत्तरपत्रिका व प्राध्यापकांची संख्या याबाबत उपकुलसचिव, केंद्रीय मूल्यांकन कक्ष, परीक्षा विभाग, मुंबई विद्यापीठ यांचे प्रमाणपत्र घेणे आवश्‍यक आहे. हे प्रमाणपत्र संलग्नता, नियमितता, नैसर्गिक वाढ, प्रवेश क्षमता, पदव्युत्तर केंद्र/संशोधन केंद्र, तसेच विद्यार्थ्यांची नोंदणी याबाबत विद्यापीठाला प्रस्ताव सादर करताना बंधनकारक राहील. याबाबतचे परिपत्रक विद्यापीठाने महाविद्यालयांना पाठवले आहे. 

मूल्यांकन केंद्र अनिवार्य 
मुंबई विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व प्राध्यापकांना ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीत "टॅग' करणे आवश्‍यक केले आहे. प्रत्येक महाविद्यालयाने ऑनलाईन मूल्यांकन प्रणालीद्वारे "ओएसएम' मूल्यांकन केंद्र सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. 

प्रथम सत्राची परीक्षा विद्यार्थ्यांच्या करिअरच्या दृष्टीने महत्त्वाची असते. यामुळे निकाल वेळेवर जाहीर करणे, ही विद्यापीठाची प्राथमिकता आहे. सर्व महाविद्यालये कमीत कमी दीडपट उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन करतील, असा मला विश्‍वास वाटतो. 
- डॉ. सुहास पेडणेकर, कुलगुरू, मुंबई विद्यापीठ. 

Web Title: colleges to evaluate at least one-half of the answer sheets of students