विधी शाखेच्या परीक्षा महाविद्यालतच?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 मे 2018

मुंबई - विद्यापीठातील विधी शाखेच्या सत्र १ ते ४ आणि सत्र ५ ते ८ या परीक्षा महाविद्यालयातच घेण्याचा निर्णय विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांनी घेतला आहे. त्यामुळे परीक्षा विभागावर पडणारा अतिरिक्त ताण कमी होणार असून, विद्यार्थ्यांनाही दिलासा मिळणार आहे. विधी महाविद्यालयांनी नियमाप्रमाणे परीक्षा घेऊन वेळेवर निकाल जाहीर करावा, असे आवाहन कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले आहे.

विधी शाखेच्या मार्च २०१८च्या आठ परीक्षा महाविद्यालयीन स्तरावर घेण्याबाबत विद्यापीठाने सर्व विधी महाविद्यालयांचे प्राचार्य आणि परीक्षा समन्वयक यांच्यासोबत विद्यानगरीतील महात्मा फुले भवनात शनिवारी बैठक घेतली होती. या वेळी ४८ विधी महाविद्यालयाचे प्राचार्य व समन्वयक उपस्थित होते. विद्यापीठाचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी परीक्षा महाविद्यालयात कशा स्वरूपात घेतल्या जाव्यात, याची कार्यपद्धती कशी असेल, याबाबत माहिती दिली. विधी शाखेच्या पाचवर्षीय अभ्यासक्रमाच्या सत्र पाच ते आठ अशा चार परीक्षा तसेच तीनवर्षीय विधी शाखेच्या सत्र एक ते चार, अशा परीक्षा प्रथम सत्र २०१८ च्या उन्हाळी सत्राच्या परीक्षेपासून महाविद्यालय घेणार आहे. तीनवर्षीय विधी शाखेच्या सत्र पाच, सहा आणि पाचवर्षीय विधी शाखेच्या सत्र नऊ व दहा या परीक्षा मात्र विद्यापीठ घेणार आहे.

विधी महाविद्यालयांच्या काही परीक्षा ३० मेपासून, तर काही परीक्षा जूनपासून सुरू होत आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांची परीक्षा घेताना त्यांची नियमानुसार काळजी घेण्यात यावी, त्यांच्या उत्तरपत्रिकेचे मूल्यांकन करताना प्रत्येक उत्तरपत्रिकेवर फिजिकली चॅलेन्ज्ड (पीसी), असा शिक्का असावा, दिव्यांगांच्या मूल्यांकनाच्या नियमानुसार या उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे आवाहन घाटुळे यांनी केले.

वेळापत्रक, प्रश्‍नपत्रिका विद्यापीठातून 
महाविद्यालयातील या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज घेणे, हॉल तिकीट, परीक्षा, मूल्यांकन, निकाल, पुनर्मूल्यांकन व उत्तर पत्रिकेच्या मूल्यांकनाची छायाप्रत देणे, अशा सर्व बाबी महाविद्यालयांना विद्यापीठाच्या नियमांप्रमाणे कराव्या लागणार आहेत; मात्र या परीक्षेच्या तारखा व वेळापत्रक विद्यापीठ जाहीर करणार असून, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका विद्यापीठाकडून महाविद्यालयाला पाठवले जातील, असे डॉ. अर्जुन घाटुळे यांनी सांगितले.

Web Title: commerce side exam in college