मृतदेह अदलाबदल प्रकरण! हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांना आयुक्तांचा दणका

सकाळ वृत्तसेवा 
Sunday, 31 May 2020

  • कोरोनाकाळात हलगर्जी करणाऱ्या डॉक्टरांना आयुक्तांचा दणका
  • मयताची अदलाबदल प्रकरणी तीन जणांना नोटीसा

 

नवी मुंबई : कोरोनाकाळात हलगर्जी करून कर्तव्यात कसुर करणाऱ्या डॉक्टरांना महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी दणका दिला आहे. वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात मयताची अदलाबदल झाल्याप्रकरणी मिसाळ यांनी तीन डॉक्टरांना कारणे द्या नोटीस बजावली आहे. तसेच पनवेल येथील इंडीया बूल्स क्वारंटाईन केंद्रात रुग्णांना सेवा देण्यात दूर्लक्ष केल्यामुळे वैद्यकीय अधिकारी डॉ. रावसाहेब पोटे यांनाही नोटीस बजावली आहे.  

कोरोना वॉर्डातून मिळाला डिशचार्ज, घरी आलेत आणि अवघ्या चार तासात....

वाशीतील महापालिकेच्या रुग्णालयात मृतदेह गायब झाल्याची धक्कादायक घटना 16 मे ला उघडकीस आली होती. उलवे येथील नागरीक त्यांच्या कुटुंबातील इसमाचा मृतदेह आणण्यासाठी वाशी रुग्णालयात गेल्यावर मृतदेह जागेवर नसल्याने ही बाब समोर आली. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात महापालिकेतर्फे अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी करण्यासाठी अण्णासाहेब मिसाळ यांनी वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत चौकशी सुरू केली. ही चौकशी पूर्ण झाली असून या चौकशीत वाशी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. प्रशांत जवादे, न्यायवैद्यकशास्त्रतज्ञ डॉ. भूमेश दराडे आणि डॉ. भूषण जैन अशा तीन जणांवर हलगर्जी, कर्तव्यात कसुर केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

सर्वात मोठी बातमी - कोरोना रुग्णांना उपचार देण्याबाबत झाला 'मोठा' निर्णय...

अहवालात नमूद केल्यानुसार महापालिका हद्दीच्या बाहेरील शव घेण्यास मनाई केली असतानाही हद्दीबाहेरचे शव विनापरवानगी शवागारात ठेवले. जेव्हा महापालिका हद्दीतील आधीच्या मृताच्या नातेवाईकांना त्यांचे मृतदेह देताना त्याची ओळख न पटवताच मृतदेह ताब्यात दिला. उलवे येथील इसमाचा मृतदेह शवागारातील ज्या पेटीत ठेवला होता. त्यापेटीत आधीपासूनच असणाऱ्या मृतदेहाला नाव, लिंग, वय व पत्ता अशा वर्णनाची माहिती लिहीलेली नव्हती. शवपेटीत आधीच एक मृतदेह असताना दुसरा आणखीन एक मृतदेह ठेवणे अशा विविध प्रकारचे ठपके शवागार विभागातील जैन आणि दराडे यांच्यावर ठेवण्यात आले आहेत. हे सर्व ज्यांच्या नियंत्रणाखाली घडले त्याबाबत चूकीचा अहवाल प्रशासनाला सादर करून दिशाभूल करण्याचा ठपका डॉ. जवादे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे या तिघांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसांच्या आत खुलासा करणे बंधनकारक आहे. समाधानकारक खुलासा न केल्यास प्रशासनातर्फे निलंबनाची कारवाई करण्यात येईल अशा इशारा मिसाळ यांनी दिला आहे. 

गेल्या 10 वर्षांत तिसऱ्यांदा असं घडल्याने मुंबईकर घामाघूम...

इंडीयाबूल्स मधील उद्रेक अंगलट
पनवेल येथील इंडीया बूल्स क्वारंटाईन केंद्रात नवी मुंबई महापालिकेने सौम्य लक्षणे असणाऱ्या कोरोनाच्या रुग्णांची राहण्याची व्यवस्था केली होती. या केंद्राचे परिचलन करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी डॉ.रावसाहेब पोटे यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. कोरोनाबाधित रुग्णांची काळजी घेण्याची जबाबदारी पोटेंकडे सोपवण्यात आली होती. परंतू इंडीयाबूल्समध्ये रुग्णांकडे दूर्लक्ष होत असल्याचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला होता. त्यावेळी आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी स्वतः भेट देऊन पाहणी केली होती. तसेच अधिक चौकशी केली असता पोटे यांनी कर्तव्यात कसूर केल्याचे आढळून आल्याने त्यांना कारणे द्या नोटीस बजावली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner annasaheb misal slaps negligent doctors