आयुक्त रजेवर, ठाणे पालिकेचा अर्थसंकल्प रखडणार! 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 मार्च 2020

शहरात आक्रमकपणे रस्ता रुंदीकरणासह अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर एक मार्चपासून सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी थेट मुख्य सचिव अजय मेहता यांना पाठविले आहे. सत्ताधारी शिवसेनेसह महापालिकेतील काही अधिकाऱ्यांबरोबर आलेल्या वितुष्टामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण आयुक्त रजेवर गेल्यास यंदाही महापालिकेचा अर्थसंकल्प रखडण्याची शक्‍यता आहे. 

ठाणे : शहरात आक्रमकपणे रस्ता रुंदीकरणासह अनेक नावीन्यपूर्ण प्रकल्प आणण्याचा प्रयत्न करणारे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अखेर एक मार्चपासून सुट्टीवर जाण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे पत्र त्यांनी थेट मुख्य सचिव अजय मेहता यांना पाठविले आहे. सत्ताधारी शिवसेनेसह महापालिकेतील काही अधिकाऱ्यांबरोबर आलेल्या वितुष्टामुळे आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. पण आयुक्त रजेवर गेल्यास यंदाही महापालिकेचा अर्थसंकल्प रखडण्याची शक्‍यता आहे. 

'ज्या गावात भीक मागीतली, त्याच गावात माझा सत्कार झाला'

जानेवारी (2020) महिन्यात जयस्वाल यांचा महापालिकेतील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. कोणत्याही महापालिका आयुक्ताला एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच ठिकाणी काम करण्याची संधी दिली जात नाही. पण सातत्याने नावीन्यपूर्ण काम करणाऱ्या जयस्वाल यांना तब्बल पाच वर्षे काम करण्याची संधी भाजपनंतर शिवसेनेच्या सरकारनेही दिली आहे.

पण पाच वर्षे पूर्ण झाल्याने यावेळी त्यांची बदली ही सरकारी कामकाजाचा अपरिहार्य भाग मानला जात होता. मात्र शहरातील महात्त्वाकांक्षी अशा क्‍लस्टरची पायाभरणी वेगाने होण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी जयस्वाल यांच्या बदलीचा विषय बाजूला ठेवल्याची चर्चा होती. 

सिग्नलवरची मुले आता तयार करणार रोबो

नुकताच राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते क्‍लस्टर योजनेचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांच्या कामकाजाचे कौतुक केले होते. मात्र त्यानंतर पालिकेतील बदल्या करताना शिवसेनेला विश्वासात घेतले नसल्याची तक्रार थेट नगरविकास मंत्र्यांकडे करण्यात आली होती.

त्यामुळे आयुक्त आणि शिवसेना अशा बेबनाव सुरू झाला होता. यापूर्वी असा बेबनाव झाल्यास एकनाथ शिंदे त्यामध्ये मध्यस्थी करीत होते. पण थेट नगरविकास मंत्रीच नाराज झाल्याने आयुक्तांनी थेट रजेवर जाण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. 

दुसरीकडे बदली देण्याची मागणी 
गेला महिनाभर विविध कारणांमुळे ठाणे पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि आयुक्तांमध्ये शीतयुद्ध सुरू आहे. त्यातच महापौरपदावर नरेश म्हस्के बसल्यानंतर शिवसेना विविध विषयांवर अधिक आक्रमक झाली होती. त्यामुळे प्रशासनाकडून येणाऱ्या अनेक प्रस्तावांना अडथळा आणला जात होता. त्याच वातावरणात महापालिकेतील उपायुक्तांच्या बदल्यांवरूनचे शीतयुद्ध पराकोटीला पोहचले होते. अशा वातावरणात काम करणे शक्‍य नसल्याने दुसरीकडे बदली देण्याची मागणी संजीव जयस्वाल यांनी केली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner on leave, Thane Municipality budget will hold!