esakal | सिग्नलवरची मुले आता तयार करणार रोबो 
sakal

बोलून बातमी शोधा

file

रोबेटीक लॅबचे खासदार डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते उद्‌घाटन 

सिग्नलवरची मुले आता तयार करणार रोबो 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

ठाणे : शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही काही समूह शिक्षणाच्या परिघाबाहेर राहत होता. सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल म्हणावे लागेल. सिग्नल शाळेने शिक्षणाचा परिघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले, रोबेटीक लॅबसारख्या आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत उभ्या राहत आहेत. यामुळे सिग्नल शाळेतील मुले रोबोची निर्मिती करणार असल्याची अतिशय अभिमानास्पद बाब आहे. एक दिवस मुख्य धारेच्या शाळेतील मुले सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील, असा विश्वास खासदार डॉ. खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी येथे व्यक्त केला.

हेही महत्त्वाचे... ठाकरे सरकार देणार मुस्लिम समाजाला गिफ्ट 

सिग्नल शाळेतील रोबेटीक लॅब उद्‌घाटन कार्यक्रमात उद्‌घाटक म्हणून ते बोलत होते. ठाण्यातील सिग्नल शाळा नुकतीच अंत्योदय बेस्ट प्रॅक्‍टिस म्हणून निवडण्यात आली. शिक्षण हक्क कायदा व सर्व शिक्षा अभियानासारख्या शासकीय कार्यक्रमानंतरही शिक्षणापासून वंचित राहिलेल्या मुलांना सिग्नल शाळेमुळे शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येता आले. संगणक कक्ष, सुसज्ज प्रयोगशाळा, अद्ययावत क्रीडांगण व आता तंत्रकुशल रोबेटीक लॅब अशा आधुनिक सुविधा सिग्नल शाळेत उभ्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे एक दिवस मुख्य धारेतील शाळेतील मुले सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील. ठाणे महानगरपालिका सिग्नल शाळेच्या मागे भक्कमपणे उभी आहे.

म्हणूनच समर्थ भारत व्यासपीठसारख्या संस्थांना हा प्रयोग यशस्वी करता आला, असे प्रतिपादन विनय सहस्रबुद्धे यांनी सिग्नल शाळेतील रोबेटीक लॅबच्या उद्‌घाटनप्रसंगी केले. 

हेही महत्त्वाचे... क्रिकेट खेळताना तरुणाचा मृत्यू

केंद्र, राज्यस्तरावरील अनेक जण ठाणे महापालिकेतील पथदर्थी प्रकल्प पाहण्यासाठी येतात. सिग्नल शाळादेखील शिक्षण विभागाचा असाच अभिनव प्रकल्प आहे. महापौर या नात्याने अशा प्रकल्पांच्या मागे पालिका सदैव उभी राहील, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बोलताना केला. 

सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळणार 
रोबेटीक लॅबच्या माध्यमातून सिग्नल शाळेतील पहिली ते दहावीच्या मुलांना रोबेटीक प्रोग्रॅमिंग हार्डवेअर व सॉफ्टवेअरचे ज्ञान मिळणार असून प्रत्यक्ष रोबो बनविण्याची संधीदेखील मुलांना यामुळे मिळणार आहे. कार्यक्रमाला समर्थ भारत व्यासपीठाचे संचालक उल्हास कार्ले, व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक प्रफुल वैद्य, शशांक प्रधान आदी उपस्थित होते.