आयुक्तांच्या अभिनंदनाचे फलक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 मे 2017

ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहनचालकांना दणका दिला असून, त्यांच्या या कारवाईबद्दल शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या, तरी शहर भाजपने आयुक्तांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्तांचे फलक शहरातील वेगवेगळ्या भागांत लावून जाहीर अभिनंदन केले आहे. 

ठाणे - ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी फेरीवाले, बेशिस्त रिक्षाचालक आणि वाहनचालकांना दणका दिला असून, त्यांच्या या कारवाईबद्दल शहरातून संमिश्र प्रतिक्रिया येत असल्या, तरी शहर भाजपने आयुक्तांची पाठराखण केली आहे. विशेष म्हणजे, भाजपच्या स्थानिक नेत्यांनी आयुक्तांचे फलक शहरातील वेगवेगळ्या भागांत लावून जाहीर अभिनंदन केले आहे. 

आयुक्तांच्या विरोधात राष्ट्रवादीने आवाज उठवला आहे. महापौरांनीही प्रशासनाच्या मनमानीविरोधात सूचक वक्तव्य केल्यानंतर आता भाजपने आयुक्तांच्या कारवाईचे समर्थन सुरू केले आहे. ठाणे रेल्वेस्थानक आणि नौपाडा परिसर आयुक्तांच्या या कारवाईमुळे मोकळा झाला आहे. या भागातील स्थानिक नगरसेवक असलेले संजय वाघुले, सुनेश जोशी, प्रतिभा मढवी आणि मृणाल पेंढसे या २१ नंबर प्रभागाच्या नगरसेवकांच्या नावाने हे फलक लावण्यात आले आहे. विशेष म्हणजे, त्याचे छायाचित्र सोशल माध्यमातून व्हायरल करून आयुक्तांना पाठिंबा दिला जात आहे. 

ठाणे शहरात वाढलेल्या फेरीवाल्यांविरोधात कारवाई करावी, यासाठी भाजपचे संजय वाघुले यांनी महापालिका प्रशासनाला एक लाखांच्या बक्षिसांची घोषणा केली होती. त्याच पार्श्‍वभूमीवर ठाणे महापालिका आयुक्तांनी शहरातील फेरीवाल्यांविरोधात पालिकेची पथके सज्ज केली. यापैकी एका पथकाचे नेतृत्व करणारे उपायुक्त संजीव माळवी यांना गावदेवी येथील एका गाळेधारकाने बेदम मारहाण केली होती. त्याची दखल घेऊन महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल थेट रस्त्यावर उतरले होते. महापालिका प्रशासनावर हात टाकणाऱ्यांना धडा शिकवण्यासाठी त्यांनी गावदेवी येथील गाळे जमीनदोस्त केले. 

याशिवाय स्थानक परिसरातील फेरीवाले, रिक्षाचालक यांनाही चांगलाच प्रसाद दिला. अनेकांनी आयुक्तांच्या या हिंसक पवित्र्याविषयी तक्रार आणि टीका सुरू केली. राष्ट्रवादी आणि इतर पक्षांनीही आयुक्तांच्या मनमानीविरोधात दंड थोपटले आहेत. आयुक्तांच्या झटापट आणि धक्काबुक्कीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले आहेत. भाजपच्या नगरसेवकांनी आयुक्तांच्या पाठिंब्यासाठी मैदानात उतरत त्यांच्या अभिनंदनाचे फलक रस्त्यावर लावले आहेत. 

काय आहेत बॅनर
फेरीवाल्यांविषयीच्या बॅनरवर नौपाड्यातील पदपथ व रस्ते फेरीवालामुक्त झाले, असे म्हटले आहे. याशिवाय मोकळे पदपथ, स्थानक परिसर आणि रस्त्यांचे फोटो टाकून हे चित्र असेच दिसावे, अशा उल्लेखासह आयुक्त आणि त्यांच्या पथकाचे कौतुक यात करण्यात आले आहे. दुसऱ्या फलकात रिक्षावाल्यांच्या मनमानीचे दर्शन घडवण्यात आले आहे. मी रिक्षावाला वाहतुकीचे नियम मोडणार... अशा आशयाचा मजकूर बॅनरवर मांडण्यात आला आहे. 

नौपाड्यातील आयुक्तांनी केलेल्या कारवाईमुळे रस्ते आणि पदपथ मोकळे झाले आहेत. नौपाड्यातील नागरिकांना फायदा झाल्यामुळे आम्ही त्यांच्या अभिनंदनाचे फलक आमच्या परिसरात लावले आहेत.
- संजय वाघुले, नगरसेवक, नौपाडा.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Commissioner's congratulatory panel