`मुंबई आय' प्रकल्पाकडे कंपन्यांचे दुर्लक्ष... निविदाच नाहीत

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई : आठशे फूट उंचीवरून पर्यटकांना मुंबईनगरीचे दर्शन घडावे म्हणून वांद्रेत मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) माध्यमातून "मुंबई आय' प्रकल्प उभारण्यात येणार आहे. "लंडन आय'च्या धर्तीवर होणाऱ्या प्रकल्पासाठी इच्छुक कंपन्यांकडून निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्याची अंतिम तारीख 6 मार्च होती. मात्र, एकाही कंपनीने प्रतिसाद न दिल्याने निविदाप्रक्रियेस आणखी 15 दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 

"मुंबई आय' उभारण्याची जबाबदारी एमएमआरडीएकडे आहे. 12 फेब्रुवारी रोजी प्रकल्पाबाबतच्या सूचना-हरकती जाणून घेण्यासाठी एमएमआरडीए मुख्यालयात इच्छुक कंपन्यांची विशेष बैठक घेण्यात आली. बैठकीत आठ कंपन्यांमधून जवळपास 20 प्रतिनिधी सहभागी झाले होते. त्यात लार्सन ऍण्ड टुब्रो, रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्‍चर, एस्सेल वर्ल्ड, प्रकाश अम्युझमेंट्‌स, हितेन सेठी ऍण्ड असोसिएट्‌स आदी कंपन्यांचा समावेश होता. प्रकल्पाला आणखी जागा लागणार असल्याचा मुद्दा कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मांडला. इतरही अनेक मुद्द्यांवर बैठकीत सखोल चर्चा करण्यात आली.

अवश्य वाचा : सावधान! आजच सोडा धूम्रपान, नाहीतर भोगा `हे` गंभीर परिणाम 

"मुंबई आय'ची उंची किती असावी, पार्किंगची व्यवस्था, बांधकाम कालावधी, अपेक्षित निधी आदी विषयांवर प्रकाश टाकण्यात आला. प्रकल्पासाठी एक एकरहून अधिक जागा लागणार असण्याची शक्‍यता बहुतांश कंपन्यांनी व्यक्त केली. परंतु नियोजित ठिकाणी पुरेशी जागा नसल्याने इच्छुक कंपन्यांनी त्याकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रकल्पासाठी निविदा सादर करण्याची मुदत 20 मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

काय आहे "लंडन आय' 
1999 मध्ये 435 फूट उंचीचे "लंडन आय' बांधण्यात आले. लंडनमधील पर्यटनस्थळाला दरवर्षी सुमारे अंदाजे 30 लाख पर्यटक भेट देतात. "लंडन आय'मधून वर्षाकाठी सुमारे अंदाजे 70 कोटी पौंड महसूल जमा होतो. त्याच धर्तीवर, "मुंबई आय'च्या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्याचा राज्य सरकारचा उद्देश आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com