भ्रष्टाचार दाबण्यासाठी अधिकाऱ्यांना दिली 'ओली पार्टी'! आता कारवाईची 'किक' बसणार

सकाळ वृत्तसेवा 
शुक्रवार, 22 मे 2020

अकोला एसटी आगाराच्या विभाग नियंत्रकांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करत असलेले संनियंत्रण समितीचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे

 

मुंबई : अकोला एसटी आगाराच्या विभाग नियंत्रकांच्या भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी करत असलेले संनियंत्रण समितीचे उपमहाव्यवस्थापक शिवाजी जगताप यांची परिवहन मंत्री अनिल परब यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे. भ्रष्टाचाराचे प्रकरण दडपण्यासाठी जगताप, एसटीचे नागपूर विभाग नियंत्रक आणि अमरावती विभाग नियंत्रक यांनी लाॅकडाऊनच्या काळात अवैधरित्या प्रवास केला आणि अकोला येथील विभागीय कार्यालयाच्या विश्रामगृहात ओली पार्टी केली, असा आरोप करण्यात आला आहे. एसटी महामंडळाचे माजी संचालक विजय मालोकार यांनी ही तक्रार केली आहे. 

सर्दी खासी ना कोरोना हुआ ! अरे बापरे 'या' आजाराचा वाहक तुमच्या फ्रिजमध्येच लपून बसलाय...

अकोला एसटी आगाराच्या विभाग नियंत्रक चेनना खिरवाडकर यांनी भ्रष्टाचाराच्या प्रकरणाची चौकशी दाबण्यासाठी अधिकाऱ्यांना ओली पार्टी दिली होती. त्यासाठी संनियंत्रण समितीचे शिवाजी जगताप, नागपूर विभाग नियंत्रक निलेश बेलसरे, अमरावतीचे विभाग नियंत्रक श्रीकांत गभने लाॅकडाऊनच्या काळात प्रवासाची परवानगी नसतानाही 12 एप्रिलला सरकारी वाहनांचा गैरवापर करत अकोला जिल्ह्यात दाखल झाले होते. अकोला येथील एसटीच्या विश्रामगृहातच ही ओली पार्टी झाल्याचे पुरावे माहितीच्या अधिकारात मिळवून परिवहन मंत्र्यांना दिले आहेत, असे मालोकार यांनी सांगितले. 

परप्रांतीय कामगार करताय मुंबईला 'जय महाराष्ट्र'; प्रशासनाकडूनही मिळतेय सहकार्य

लाॅकडाऊनच्या काळात प्रवास करण्यासाठी पोलिस परवानगी आवश्यक असते. परंतु, या एसटी अधिकाऱ्यांनी महामंडळाच्या भरारी पथकाच्या वाहनाचा गैरवापर करत अकोला गाठले होते. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन कायद्याला केराची टोपली दाखवून ओली पार्टी केल्याच्या तक्रारीची परिवहन मंत्री परब यांनी गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणात  चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेत त्यांनी 'सकाळ'शी बोलताना दिले.

चौकशीचे आदेश
या प्रकरणात एसटी महामंडळाचे उपमुख्य सुरक्षा व दक्षता तअधिकारी सुनील जोशी यांनी अमरावती विभागातील सुरक्षा व दक्षता अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीचा प्राथमिक अहवाल एसटी महामंडळाला मिळाल्यानंतर कारवाई करण्यात येईल, असे जोशी यांनी सांगितले.

 

अकोला विभाग नियंत्रकांच्या भ्रष्टाचाराच्या अनेक तक्रारी एसटी महामंडळाकडे आल्या असून, चौकशीची जबाबदारी सहनियंत्रण समितीचे शिवाजी जगताप यांना देण्यात आली आहे. परंतु, या तक्रारींची दखल न घेता, प्रकरण दडपण्यासाठी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जागतिक संकटाच्या काळात कायद्यांचा भंग करून ओली पार्टी केली. या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. 
- विजय मालोकार, माजी संचालक, एसटी महामंडळ

अकोला एसटी विभागात पाच प्रकरणांची चौकशी होती. त्यासाठी सर्व परवानग्या घेऊन अकोला येथे गेलो होतो. सर्व तक्रारी आणि आरोप खोटे आहेत. 
- शिवाजी जगताप, उपमहाव्यवस्थापक, संनियंत्रण समिती


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A complaint has been lodged with Transport Minister Anil Parab by Shivaji Jagtap, Deputy General Manager, Monitoring Committee, who is probing the corruption case of Akola ST Depot Divisional Controller.