खड्ड्यांबाबत तक्रारींचा पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 3 नोव्हेंबर 2019

खड्डा दाखवा ५०० रुपये मिळवा’ असे महापालिकेने जाहीर करताच दोन दिवसांत खड्ड्यांबाबत सुमारे ७०० तक्रारी आल्या.

मुंबई : ‘खड्डा दाखवा ५०० रुपये मिळवा’ असे महापालिकेने जाहीर करताच दोन दिवसांत खड्ड्यांबाबत सुमारे ७०० तक्रारी आल्या. त्यात शनिवारी दिवसभरात ५०० च्या आसपास तक्रारी आल्या आहेत.

१ ते ७ नोव्हेंबर या काळात खड्ड्यांबाबत तक्रार केल्यानंतर २४ तासांत खड्डा दुरुस्त झाल्यास तक्रारदाराला ५०० रुपये बक्षीस देण्याचे पालिकेने जाहीर केले. ही रक्कम संबंधित जबाबदार अधिकारी आणि कंत्राटदाराकडून वसूल केली जाणार आहे. पहिल्याच दिवशी तब्बल २०४ तक्रारी आल्या. त्यातील २० रस्ते हे पालिकेच्या अखत्यारीतील नव्हते. शनिवारी सुमारे ५०० खड्ड्यांच्या तक्रारी आल्याचे समजते.

पालिकेच्या ‘फिक्‍सईट’ या मोबाईल ॲपवर खड्ड्यांबाबत तक्रार करायची आहे. खड्डा एक फूट रुंद आणि तीन इंच खोल असणे आवश्‍यक आहे. त्यासाठी खड्ड्याच्या ठिकाणाचे ‘जिओटॅगिंग’ही करायचे आहे. खड्डेदुरुस्ती वेगाने सुरू असल्याचा दावा महापालिकेकडून केला जात आहे; मात्र दुरुस्तीवर अनेकांनी आक्षेप घेतला आहे. खड्डे बुजवल्यानंतर तिथे तयार होणारे उंचवटे धोकादायक ठरू शकतात, असा दावा वाहनचालक करत आहेत.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Complaints about pits