संगणक परिचालकांचा ‘मोर्चा’

महाड : अदिती तटकरे यांना निवेदन देताना जिल्ह्यातील संगणक परिचालक.
महाड : अदिती तटकरे यांना निवेदन देताना जिल्ह्यातील संगणक परिचालक.

महाड (बातमीदार) : राज्य सरकारच्या आपले सरकार प्रकल्पात काम करणाऱ्या संगणक परिचालकांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आठ महिन्यांपूर्वी महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याचे आश्वासन दिले. मात्र, याबाबत अद्याप निर्णय न दिल्यामुळे संगणक परिचालकांनी १९ ऑगस्टपासून काम बंद आंदोलन सुरू केले आहे. 

डिजिटलच्या माध्यमातून काम केले जात असल्यामुळे २६ ऑगस्टला ट्‌विटरचा वापर करून संगणक परिचालकांनी सकाळी ६ ते सायंकाळी ६ पर्यंत ट्‌विटर मोर्चा केला. त्यात संगणक परिचालक हा हॅशटॅगचा वापर करत सरकारपुढे अनेक प्रश्न मांडले. 
राज्यातील सुमारे २९ हजार ग्रामपंचायत कार्यालयात काम करणारे संगणक परिचालकांसह ३५१ पंचायत समित्या आणि ३४ जिल्हा परिषदांमधील सर्व संगणक परिचालकांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळात सामावून घेण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी १९ ऑगस्टपासून संगणक परिचालकांचे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. सरकारने अद्याप याची दखल न घेतल्याने २६ ऑगस्टला ट्‌विटर मोर्चा ठेवण्यात आला होता. त्यात राज्यासह रायगड जिल्ह्यातील सर्व संगणक परिचालकांनी सकाळी ६ ते संध्याकाळी ६ या कालावधीत सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांना ट्‌विटरवर टॅग करून देशपातळीवर ‘संगणक परिचालक’ हा हॅशटॅग दिवसभरात अनेक वेळा पहिल्या क्रमांकावर ठेवला होता. संगणक परिचालकांनी केलेल्या ट्‌विट हल्ल्यापुढे सरकार निरुत्तर झाले आहे. सोशल मीडियावर देशात सर्वांत प्रभावी संघटना म्हणून महाराष्ट्र राज्य संगणक परिचालक संघटनेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

या आंदोलनाची दखल न घेतल्यामुळे २८ ऑगस्टला एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती संघटनेचे राज्य सचिव तथा रायगड जिल्हाध्यक्ष मयूर कांबळे यांनी दिली.

प्रमुख मागण्या
पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावरील संगणक परिचालकांना नियुक्ती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने मंजुरी दिली असून त्याचा सरकारी निर्णय काढून त्यांना महाराष्ट्र आय.टी. महामंडळाकडून नियुक्ती द्यावी. सर्व संगणक परिचालकांचे मानधन १४ व्या वित्त आयोगातून न देता राज्य सरकारच्या निधीतून प्रती महिना किमान वेतन १५ हजार रुपये द्यावे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com