'ती'चा प्रवासाचा आनंद औट घटकेचा! गोंधळाचा फटका, आनंदावर विरजन

शर्मिला वाळुंज 
Saturday, 17 October 2020

घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिला प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देण्याविषयीचे विनंती पत्र राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठविले होते.

ठाणे ः घटस्थापनेच्या मुहूर्तावर महिला प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा देण्याविषयीचे विनंती पत्र राज्य सरकारने रेल्वे प्रशासनाला पाठविले होते. हे निवेदन समाज माध्यमावर व्हायरल होताच राज्य सरकारने महिलांना रेल्वे प्रवासाची मुभा दिल्याचे वृत्त प्रसारित झाले, त्यामुळे महिला वर्गात उत्साह होता; परंतु हा गोंधळ लक्षात येताच रेल्वे प्रशासनाने लोकल फेऱ्यांचे नियोजन करण्यास काही कालावधी लागणार असल्याचे सांगत शनिवारपासून सरसकट सर्व महिलांना प्रवासाची मुभा नाकारण्यात आली. मात्र, या निर्णयाचा रेल्वे प्रशासनाने सकारात्मक विचार करून लवकर निर्णय घ्यावा, अशी मागणी महिला प्रवासी करीत आहेत. तसेच राज्य सरकारनेही केवळ परवानगी न देता कोव्हिड-19 च्या अनुषंगाने खासगी कार्यालयांना वेळेबाबत मार्गदर्शक सूचना कराव्यात, असेही प्रवाशांचे म्हणणे आहे. 

मुंबईत गेल्या 24 तासात 1,823 कोरोना रुग्णांची वाढ; तर रुग्ण दुपटीचा दर 82 दिवसांवर 

उपनगरीय रेल्वेतून 17 ऑक्‍टोबरपासून महिलांना प्रवासाची मुभा देण्यात यावी, याविषयीचे विनंती पत्र राज्य शासनाकडून शुक्रवारी रेल्वे प्रशासनाला पाठविण्यात आले होते. लोकलमध्ये गर्दी होऊ नये यासाठी अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांची सकाळची प्रवासाची वेळ वगळता सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत व सायंकाळी 7 नंतर क्‍यूआरकोडच्या ओळखपत्राशिवाय केवळ तिकिटावर सर्व महिलांना प्रवास करता येईल, अशी मागणी करण्यात आली होती. महिला प्रवाशांना तरी मुभा द्या, अशी मागणी तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटनेने मुख्यमंत्र्यांकडे केली होती. या मागणीला यश आल्याने त्यांनीही सुरुवातीला शासनाच्या या निर्णयाचे स्वागत केले. प्रवाशांमध्ये उडालेला गोंधळ लक्षात घेत रेल्वेने शनिवारपासून महिलांना ही परवानगी देता येणार नसल्याचे स्पष्ट केले. रेल्वे प्रशासनास निर्णय घेण्यास काही कालावधी लागणे गरजेचे असून तोपर्यंत महिला प्रवाशांना लोकलने प्रवास करण्याची मुभा देण्यात आलेली नाही, असा संदेश तेजस्विनी महिला प्रवासी संघटनेने देत महिलांप्रती दिलगिरी व्यक्त केली. 

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 

राज्य सरकारने परवानगी दिली, असा चुकीचा संदेश मागणी पत्रासह व्हायरल झाला; परंतु रेल्वेने ती नाकारली. लोकलने महिलांना परवानगी दिल्यास रस्ते वाहतुकीवरील काहीसा ताण हलका होईल. शिवाय अत्यावश्‍यक सेवेतील महिला प्रवासी सकाळी 11 च्या आधी प्रवास करतील, तर 11 नंतर उर्वरित सेवेतील काम करणाऱ्या महिला प्रवास करतील. त्यामुळे रेल्वेत गर्दी होणार नाही. त्यामुळे या मागणीचा विचार करून रेल्वेने लवकर निर्णय घ्यावा, असे मत महिला प्रवाशांनी यावेळी व्यक्त केले. 

 

महिला प्रवाशांना परवानगी दिल्याचे वृत्त समाज माध्यमावर आल्याने शुक्रवारी गोंधळ निर्माण झाला; परंतु कोणत्याही शासकीय प्रक्रियेला वेळ हा लागतो. रेल्वे प्रशासनाने योग्य तो निर्णय घ्यावा व महिलांना प्रवासाची मुभा द्यावी. ती प्रशासन देईल हा आम्हाला विश्‍वास आहे. रेल्वेने परवानगी दिल्यानंतर राज्य शासनाने खासगी कार्यालयांना वेळेबाबत निर्देश द्यावेत की कार्यालये उशिरा सुरू करावीत व कामाचे तासही कमी करावेत. कोव्हिडच्या अनुषंगाने राज्य सरकारने विचारपूर्वक मार्गदर्शक सूचना कार्यालयांना कराव्यात, अशी आमची त्यांना विनंती आहे. 
- लता अरगडे,
अध्यक्षा, तेजस्विनी महिला रेल्वे प्रवासी संघटना.

Confusion about allowing women to travel in local trains disengagement from womens happiness

----------------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion about allowing women to travel in local trains disengagement from womens happiness

टॉपिकस