esakal | महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 
sakal

बोलून बातमी शोधा

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 

राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची केलेल्या घोषणेमुळे सरकार आणि रेल्वे प्रशासनातील गोंधळ पुढे आला आहे. 

महिलांच्या लोकल प्रवासाबाबत सावळा गोंधळ; राज्याची घोषणा, रेल्वेचा मात्र नकार 

sakal_logo
By
प्रशांत कांबळे

मुंबई ः घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्य सरकारने महिलांना क्‍युआर कोडशिवाय लोकलने प्रवास करण्यास परवानगी दिली, मात्र हा निर्णय घेण्यापूर्वी राज्य सरकारने रेल्वे बोर्डाशी कोणतीही चर्चा केली नसल्याने एका दिवसांत त्याबाबत नियोजन करणे अशक्‍य असल्याचे पत्र मध्य आणि पश्‍चिम रेल्वेच्या वतीने राज्य सरकारला दिले आहे. त्यामुळे राज्य सरकारने महिलांना लोकल प्रवासाची केलेल्या घोषणेमुळे सरकार आणि रेल्वे प्रशासनातील गोंधळ पुढे आला आहे. 

BMCच्या प्रभाग समिती निवडणुकीत भाजप शिवसेनेत खडाजंगी; परस्पर मत बाद केल्याचा महापौरांवर आरोप

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सध्या केवळ अत्यावश्‍यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची मुभा आहे; मात्र हळूहळू मुंबईतील अनेक व्यवहार सुरळीत होत असताना सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. त्यामुळे नवरात्रीच्या पूर्वसंध्येला राज्य सरकारने महिलांना क्‍युआर कोडशिवाय लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली. सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 ते रात्री लोकल सुरू असेपर्यंत प्रवास करण्यासाठी रेल्वे तिकीट व्यतिरिक्त क्‍युआर कोडची गरज नाही. म्हणजेच सकाळी 11 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 4 ते 7 वाजेपर्यंत प्रवास करण्यासाठी मात्र महिलांनाही क्‍युआर कोडची गरज असणार आहे, त्याशिवाय महिलांनाही प्रवास करता येणार नाही, अशी माहिती राज्य सरकारच्या आपत्कालीन, मदत व पुनर्वसन विभागाने दिली. 

अतिवृष्टीग्रस्तांसाठी क्रॉस कनेक्शन! भाजपची मुख्यमंत्र्यांकडे तर काँग्रेसची नरेंद्र मोदींकडे मागणी

मात्र, राज्य सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाशी कोणत्याही प्रकारची चर्चा केली नाही. एका दिवसापूर्वी परस्पर निर्णय घेतल्याने त्याबाबत नियोजन करणे अशक्‍य आहे. त्यातही जोपर्यंत रेल्वे मंत्रालयाची परवानगी मिळत नाही आणि महिलांच्या लोकल प्रवासाबाबत नियोजन करण्यासाठी एकत्रित चर्चा होत नाही, तोपर्यंत महिलांना सरसकट लोकल प्रवासाची परवानगी देता येणार नाही, अशी पत्र मध्य आणि पश्‍चिम रेल्वेने एकत्रितरित्या राज्य सरकारच्या आपत्कालीन, मदत व पुनर्वसन विभागाला पाठवले आहे. 

राज्य सरकारने आतापर्यंत घेतलेल्या प्रत्येक निर्णयाचा रेल्वे प्रशासनाने सन्मान केला आहे. मात्र, महिलांना लोकलने प्रवास करण्यास परवानगी देण्याबाबत राज्य सरकारने रेल्वे प्रशासनासोबत कोणतीही चर्चा केली नाही. रेल्वे मंत्रालयाच्या परवानगीशिवाय महिलांना लोकल प्रवासाची परवानगी देता येत नाही. 
- शिवाजी सुतार,
मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे.

-------------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )