
मुंबईकरांमध्ये मास्कबाबत संभ्रम!
मुंबई - मुंबईत पालिकेसह खासगी रुग्णालयांत कोविड रुग्णसंख्या हळूहळू वाढू लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून रुग्ण वाढू लागल्यामुळे राज्य सरकारचे आरोग्य विभाग मास्कसक्तीवर चर्चा, विनिमय करत आहेत. दरम्यान, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी तूर्तास मास्क सक्ती केली नसली, तरीही गर्दीत जाताना स्वतःची सुरक्षा म्हणून मास्क वापरावा, असे आवाहन केले आहे. यासह वैद्यकीय तज्ज्ञही आधीपासूनच सक्तीचे नसले, तरी मास्क वापरण्याचा सल्ला देत आहेत. कोरोना रुग्णासंख्या हळूहळू वाढत असल्याने आता पुन्हा यावर चर्चा सुरू झाली असून मुंबईकरांमध्ये मात्र मास्कबाबत संभ्रम आहे. कोविड रुग्णसंख्या कमी झाल्याने राज्य सरकारतर्फे निर्बंध हटवण्यात आले. त्यामुळे रस्त्यांवर, मैदानांमध्ये, उद्यानांत, इतर सार्वजनिक ठिकाणी पुन्हा गर्दी होत आहे. लग्नसराईदेखील सुरू झाल्याने खरेदीची लगबगही दिसत आहे. सरकारने मास्क सक्ती उठवली आणि अनेकांना मास्कचा विसर पडला. जे नागरिक कोविड सुरू झाल्यापासून मास्क वापरत होते, ते आता मास्क घालण्यासाठी टाळाटाळ करत आहेत. मात्र, काही जण आजही कोविड आणि मास्कला गांभीर्याने घेत असून मास्क वापरताना दिसतात. याच पार्श्वभूमीवर सध्याची कोविड परिस्थिती आणि मास्क सक्तीविषयी मुंबईकरांना नेमके काय वाटते, हे जाणून घेतल्यानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.
‘सुरक्षा हवी तर मास्क वापरा’
मुंबई सध्या निर्बंधमुक्त होण्याच्या मार्गावर आहे. कमी झालेली कोविड रुग्णांची संख्या, मृत्युदर, सकारात्मकता दर हे सर्व दृश्य दिलासादायक जरी असले, तरी मुंबईसारख्या शहरात कोविड नियम पाळणे कठीण आहे. सामाजिक अंतर पाळणे कठीण आहे. सर्व निर्बंध शिथिल झाले, तरी मास्क वापरणे हा नियम असलाच पाहिजे. मास्क याआधी एकच आजारी व्यक्ती वापरायची, पण आता तसे नाही. आता दोघांना सुरक्षा हवी असेल तर मास्क वापरला पाहिजे, असे टास्क फोर्स सदस्य आणि मृत्यू निरीक्षण समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले.
Web Title: Confusion About Masks Among Mumbaikars
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..