ठाण्यातील लॉकडाऊनबाबत सावळा गोंधळ, पोलिस आणि महापालिकेत समन्वय नाही का ?

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जून 2020

महापालिका, पोलिसांच्या बैठकीनंतरही रात्री उशिरापर्यंत निर्णय नाहीच

ठाणे : ठाणे शहरात कोरोना बाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन शहरातील केवळ काही हॉटस्पॉटच पूर्णपणे बंद करुन चालणार नाहीत, उलट त्यामुळे त्या भागातील नागरीक इतर भागात जाऊ शकतात आणि त्या भागातील कोरोनाच्या रुग्ण संख्येतही वाढ होऊ शकते, अशी शंका निर्माण झाल्यानंतर २ जुलैच्या मध्यरात्रीपासून ते १२ जुलै मध्यरात्री १२ वाजेपर्यंत संपूर्ण शहर लॉकडाऊन करण्याचा निर्णय ठाणे जाहीर केला होता. त्यात संपूर्ण शहरात की केवळ कोरोना हॉटस्पॉट ठरलेल्या भागात लॉकडाऊन घ्यावा, याबाबत रात्री उशिरापर्यंत कोणताही निर्णय होवू शकलेला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर लॉकडाऊनबाबत शहरात संभ्रमाचे वातावरण होते.

अनलॉक जाहीर झाल्यापासून शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. झोपडपटटी पाठोपाठ अनेक सोसायटींमध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. बाळकुम, कोलशेत, मानपाडा, नौपाडा, कोपरी, वर्तकनगर आदीसह इतर भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, अशावेळी सुरुवातीला ज्या भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, ते भाग शोधून ते भाग हॉटस्पॉट घोषीत करुन त्या भागांमध्येच बंद करण्याची चर्चा दोन दिवस सुरु होती. त्यानुसार २२ ठिकाणे देखील निश्चित करुन त्या ठिकाणांमधील हॉटस्पॉटही निश्चित करण्यात आले.

मोठी बातमी - झोपडपट्टीपाठोपाठ आता इमारतींमध्येही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव; महापालिकेनेच जाहीर केली आकडेवारी...

दरम्यान, त्यानंतर सोमवारी सकाळी महापालिका आयुक्त विपिन शर्मा यांच्या मार्गदशर्नाखाली पालिका अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यात केवळ हॉटस्पॉट बंद करुन चालणार नसल्याचे प्रत्येक उपायुक्तांनी सांगितले. कारण या हॉटस्पॉटमधील नागरीक चोरी-छुपे दुसऱ्या भागात जाऊ शकतील, त्यामुळे इतर भागातही कोरोनाचे रुग्ण वाढू शकतात. त्यामुळे हॉटस्पॉटच नाही, तर संपूर्ण ठाणे शहर बंद करावे, यावर एकमत झाले. त्यानंतर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर यांच्याबरोबर देखील पालिका आयुक्तांची बैठक झाली. या बैठकीत संपूर्ण ठाणे शहर बंद करण्यावर एकमत झाले. त्यानुसार २ जुलैच्या मध्यरात्री १२ ते पुढील दहा दिवस या कालावधीत संपूर्ण ठाणे शहर बंद राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.

दरम्यान, दुपारी पुन्हा लॉकडाऊनबाबत निर्णय घेण्यासाठी पोलिस प्रशासन व पालिका प्रशासन यांची एक महत्वपूर्ण बैठक झाली. त्यात लॉकडाऊनबाबत योग्य तो निर्णय होवू शकला नाही. त्यामुळे सोमवारी दिवसभर लॉकडाऊनबाबत शहरात संभ्रमाचे वातावरण होते. 

हे बंद राहणार...

बंददरम्यान शहरातील अंतर्गत रस्ते बंद राहणार असून, प्रत्येक महत्वाच्या स्पॉटवर पोलिसांचा खडा पहारा असणार आहे. याशिवाय शहरातील किराणा मालाची दुकाने, इतर साहित्याची दुकाने, भाजी मार्केट हे सर्व देखील या कालावधीत बंद राहणार आहेत. कोणाालाही विनाकारण घरा बाहेर पडता येणार नाही.

#Danger :: मुंबईतील 'या' भागातील मृत्यूदर जगाच्या दुप्पट तर देशाच्या तीप्पट...

हे सुरु राहणार...

दहा दिवसांच्या बंदच्या काळात केवळ दुध विक्रीची दुकाने, मेडिकल आणि डॉक्टरांचे दवाखाने सुरु राहणार आहे. तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच याकाळात ये-जा करण्याची मुभा असणार आहे. महामार्ग सुरु राहणार आहेत.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता, आम्ही हा निर्णय घेतला आहे. सुरुवातीला हॉटस्पॉट बंद करण्याचा विचार होता., परंतु त्यामुळे पूर्णपणे नियंत्रण मिळवता येईल, असे नाही. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुनच हा निर्णय घेण्यात आला आहे असं ठाण्याचे अतिरिक्त महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी म्हटलंय. 

confusion over implementing full lockdown in thane or implementing it in corona hotspots


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: confusion over implementing full lockdown in thane or implementing it in corona hotspots