एसटीतील बदल्यांचा घोळ...मंत्र्याच्या यादीतील नावे नसल्याने स्थगिती दिल्याची चर्चा

प्रशांत कांबळे
Friday, 4 September 2020

राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळात 15 टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 379 चालक आणि 108 वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीरही झाली. मात्र, या बदली यादीला खुद्द एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनीच स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या यादीत मंत्र्यांना अपेक्षित नावे नसल्याने बदल्यांना तात्काळ स्थगिती दिल्याची चर्चा एसटी मुख्यालयात सुरू आहे. 

मुंबई : राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळात 15 टक्के बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार गुरुवारी सायंकाळी 5 वाजता 379 चालक आणि 108 वाहकांच्या बदल्यांची यादी जाहीरही झाली. मात्र, या बदली यादीला खुद्द एसटीच्या व्यवस्थापकीय संचालकांनीच स्थगिती दिल्याची चर्चा आहे. या यादीत मंत्र्यांना अपेक्षित नावे नसल्याने बदल्यांना तात्काळ स्थगिती दिल्याची चर्चा एसटी मुख्यालयात सुरू आहे. 

क्लिक करा : विक्रमगड-पाली मार्गावर एसटी-कंटेनरमध्ये भीषण अपघात; 11 प्रवासी जखमी

सरकारने 10 आगस्टपर्यंत 15 टक्के बदल्या पूर्ण करण्याचे आदेश दिले होते. महामंडळात बदलीसाठी मात्र मुदतवाढ घेण्यात आली होती. तरीही एसटी महामंडळातील बदल्यांचा गोंधळ संपताना दिसत नाही. गुरुवारी झालेल्या बदल्यांमध्ये सेवा ज्येष्ठता पाळण्यात आली नाही. तर कोकणातील कर्मचाऱ्यांची सुद्धा यामध्ये बदली करण्यात आली. यामध्ये काही काळापूर्वी औरंगाबाद येथून रायगड विभागात बदली केलेल्या दोन चालकांना पुन्हा अल्पावधीतच रायगड येथून अहमदनगर येथे बदली दिल्याने बदलीच्या यादीत घोळ असल्याचे बोलले जात आहे.

परिवहन मंत्री अॅड. अनिल परब यांना अपेक्षित कर्मचाऱ्यांची नावे बदलीच्या यादीतून गहाळ असल्याने, त्यांनी नाराजी व्यक्त केली. परिणामी यादी जाहीर होताच काही तासातच बदलीला स्थगिती दिल्याची चर्चा एसटीच्या मुख्यालयात रंगली आहे. यासंदर्भात परिवहन मंत्री अॅड. अनिल परब, एसटीचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, तथा एसटीच्या वाहतूक विभागाचे व्यवस्थापक राहूल तोरो यांच्याकडून प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र, प्रतिक्रिया मिळू शकली नाही.

क्लिक करा : अंतिम वर्ष परीक्षांचा पेच सुटणार! विद्यापीठांच्या कुलगुरुंची आज राज्यपालांसोबत बैठक

मंत्र्यांचा बदलीत हस्तक्षेप
एसटीच्या 15 टक्के बदली प्रक्रियेत यापूर्वी परिवहन मंत्र्यांच्या कार्यालयातून एसटीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा झाली आहे. मात्र, मंत्र्यांनी सुचवलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या नियमांमध्ये बसत नसल्याने एसटीच्या काही अधिकाऱ्यांनी हात वर केले होते. त्यामुळे या बदली प्रक्रियेला उशीर होत असून, या संपूर्ण बदली प्रक्रियेत परिवहन मंत्र्यांचा जास्त हस्तक्षेप असल्याने बदल्यांची प्रक्रियाच पार पडत नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

---------------------
(संपादन : प्रणीत पवार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Confusion in State Transport Corporation transfers