संकेतस्थळावर गोंधळ सुरूच 

श्रीकांत सावंत - सकाळ वृत्तसेवा 
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

ठाणे - पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेचा ऑनलाईन पद्धतीने अत्यंत प्रभावी वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिका यंत्रणांना दिल्या असल्या, तरी या प्रक्रियेत पालिकेचा गोंधळ नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी उमेदवारांची परिपूर्ण माहिती, त्यांचे पत्ते, वय आणि इतर माहिती जाहीर करण्याची गरज असताना पालिकेच्या यंत्रणांची यात पुरती दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे उमेदवारांची अपुरी माहिती संकेतस्थळावर दिली आहे. अनेक महत्त्वाची माहिती अद्याप दिली नसल्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने अभ्यास करणाऱ्या जागरूक नागरिकांना याचा फटका बसत आहे.

ठाणे - पालिकेच्या निवडणूक प्रक्रियेचा ऑनलाईन पद्धतीने अत्यंत प्रभावी वापर करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने पालिका यंत्रणांना दिल्या असल्या, तरी या प्रक्रियेत पालिकेचा गोंधळ नागरिकांची डोकेदुखी ठरू लागला आहे. निवडणूक प्रक्रियेत सहभागी उमेदवारांची परिपूर्ण माहिती, त्यांचे पत्ते, वय आणि इतर माहिती जाहीर करण्याची गरज असताना पालिकेच्या यंत्रणांची यात पुरती दमछाक होऊ लागली आहे. त्यामुळे उमेदवारांची अपुरी माहिती संकेतस्थळावर दिली आहे. अनेक महत्त्वाची माहिती अद्याप दिली नसल्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने अभ्यास करणाऱ्या जागरूक नागरिकांना याचा फटका बसत आहे. उमेदवारांची आर्थिक माहिती, गुन्हेगारी पार्श्वभूमी या सर्वांची माहिती उमेदवाराने भरलेल्या अर्जावर असते; मात्र पालिकेने अनेक प्रभागातील अर्ज अद्याप जाहीर केले नसल्यामुळे त्यांची माहिती दडवून ठेवल्याचा आरोप होण्याची शक्‍यता आहे. 

पालिकेच्या निवडणूकविषयक संकेतस्थळावरील तांत्रिक त्रुटींबद्दल "सकाळ'च्या माध्यमातून सातत्याने आवाज उठवला जात आहे. संकेतस्थळावर उमेदवारांची परिपूर्ण माहिती उपलब्ध व्हावी. अनेक सुजाण नागरिक या उमेदवारांची आर्थिक, गुन्हेगारी आणि अन्य पार्श्वभूमी पाहण्यासाठी त्यांचे प्रतिज्ञापत्रक तपासत असतात. त्यामुळे पालिकेने त्यांच्याकडे येणारे प्रत्येक प्रतिज्ञापत्रक संकेतस्थळावर घोषित करण्याची गरज असते. यापूर्वी झालेल्या सर्व लोकसभा, विधानसभा आणि अन्य निवडणुकांच्या वेळी राज्य निवडणूक आयोगाने त्याची माहिती त्याच क्षणी जाहीर करून नागरिकांपर्यंत तत्काळ परिपूर्ण माहिती पोहोचवली होती. मात्र पालिका निवडणुकांमध्ये ऑनलाईन पद्धतीने निवडणूक अर्ज भरण्याची व्यवस्था असल्यामुळे ही माहिती अधिक प्रभावीपणे, जलद आणि स्पष्टपणे नागरिकांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात अजूनही अनेक उमेदवारांचे प्रतिज्ञापत्र संकेतस्थळावर उपलब्ध झालेले नाहीत. उमेदवारांच्या यादीमध्येही गोंधळ असून एका यादीमध्ये उमेदवार, नाव, पत्ता पक्ष इतकीच माहिती दिली आहे, तर दुसऱ्या यादीतील मंडळींची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. पालिकेच्या गोंधळामुळे हा प्रकार वाढीस लागल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. त्यामुळे संकेतस्थळावर माहिती देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. 

ठाणे पालिकेचे आयुक्त आणि प्रशासकीय अधिकारी कार्यक्षम असतानाही ही अडचण येते, ही आश्‍चर्याची गोष्ट आहे. यापूर्वीची कामे अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करत असताना निवडणूक कामामध्ये तांत्रिक बिघाड येणे हे संशय निर्माण करणारे आहे. ठराविक उमेदवारांची माहिती देणे आणि अन्य मंडळींची माहिती न देणे हा अत्यंत गंभीर प्रकार आहे. निवडणुकीच्या उमेदवारांची यादी निश्‍चित झाल्यामुळे या सगळ्यांची माहिती तत्काळ देणे गरजेचे आहे. 
- उज्ज्वल जोशी, नागरिक, ठाणे. 

निवडणूकविषयक माहिती संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहोत. मात्र तांत्रिक बिघाडामुळे ती पोहोचण्यास अडचणी येत असाव्यात. त्याविषयी माहिती घेऊन त्यावर तातडीने काम करण्यात येईल. 
- संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे पालिका.

Web Title: confusion on the website