कोपरा पुलाजवळील कोंडी सुटणार 

सकाळ वृत्‍तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

आठवड्याभरात कामाला सुरुवात; डिसेंबरअखेर काम पूर्ण

 खारघर : खारघरमधील कोपरा पुलाचे काम सिडकोने हाती घेतले असून डिसेंबरअखेरपर्यंत पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्‍न सुटणार आहे. पुलाच्या कामासाठी सिडकोकडून २५ लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे सिडको अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. 

खारघर आणि कोपरा वसाहतीच्या सीमारेषेवर असलेल्या नाल्यावर सिडकोने खारघर शहर विकसित करताना एकेरी मार्ग असलेला पूल उभारला होता. खारघरच्या विकासात भर पडल्याने या पुलावरून मुंबई आणि पनवेलकडे जाणाऱ्या वाहनांच्या संख्येत भर पडली. त्यामुळे एकेरी पुलावर वाहतूक कोंडी होऊ लागल्याने सिडकोने तीन वर्षांपूर्वी जुन्या पुलाशेजारी दुसऱ्या एकेरी मार्गाचा पूल उभारला. त्यामुळे वसाहतीच्या बाहेर आणि आत प्रवेश करण्यासाठी दोन पूल झाल्याने वाहतूक कोंडी दूर झाली होती. 

दरम्यान मागील वर्षी एप्रिल महिन्यात सिडकोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खारघरमध्ये भेट दिली असता नाल्यावरील जुना पूल कमकुवत असल्याचे निदर्शनास येताच त्यांनी तज्ज्ञांकडून पुलाची तपासणी करून घेतली. हा पूल कमकुवत असल्याचा अहवाल प्राप्त होताच सिडकोने पर्यायी मार्ग उपलब्ध करून न देता जुना पूल वाहतुकीसाठी बंद केला. त्यामुळे एकेरी पुलावर दोन्ही बाजूने ये-जा करणाऱ्या वाहनाच्या रांगा लागत आहेत.याशिवाय वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिस दुर्लक्ष करीत असल्यामुळे कोंडीत भर पडू लागली आहे. 

कोपरा जुना पूल दुरुस्तीचे काम महिंद्रा रियलटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनीला देण्यात आले आहे. आठवड्याभरात कामाला सुरुवात करण्यात येणार असून डिसेंबरअखेरपर्यंत काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
- संजय पुडाळे, कार्यकारी अभियंता, सिडको


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The congestion will escape near the corner bridge