esakal | माझं वर्षभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी!

बोलून बातमी शोधा

balasaheb-thorat

लसीकरणाचा भार पाहता काँग्रेसचा स्तुत्य निर्णय; पाच लाखांची मदत

माझं वर्षभराचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी!
sakal_logo
By
विराज भागवत

मुंबई: महाराष्ट्रातील जनतेला ठाकरे सरकारने बुधवारी खुशखबर दिली. १८ ते ४४ या वयोगटातील सर्वांना मोफत लस देण्यात येणार असल्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत एकमताने घेण्यात आला. महाराष्ट्रातील १८ ते ४४ या वयोगटातील ५ कोटी ७१ लाख नागरिकांसाठी सुमारे २ कोटी डोसेसची गरज लागणार आहे. मोफत लसीकरणाच्या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर ६ हजार ५०० कोटींचा बोजा पडणार आहे. याचा विचार करता काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी आज एक महत्त्वाचा निर्णय घेतला.

हेही वाचा: मनसुखचा फोन त्या माणसानेच हिसकावून घेतला; NIAचा दावा

"राज्याच्या तिजोरीवरील मोठा आर्थिक भार पाहता मला जे मानधन मिळतं, ते 1 वर्षाचं मानधन मी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहे. तसंच, काँग्रेसचे विधान सभा आणि विधान परिषदेतील आमदार त्यांचे एका महिन्याचे वेतन मदत म्हणून देणार आहेत. याशिवाय, महाराष्ट्र काँग्रेसच्या वतीने 5 लाखांचा निधी दिला जाणार आहे. त्यासोबतच आमच्या अमृत उद्योग समूहात सुमारे ५ हजार कर्मचारी आहेत. त्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाचा जो खर्च होईल, तो आम्ही मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देणार आहोत. राज्याच्या तिजोरीवर येणारा भार कमी करण्यासाठी आमचा हा प्रयत्न असणार आहे", अशी माहिती त्यांनी दिली.

"काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ज्या पद्धतीने निवेदन केले आहे, त्या पद्धतीने लोकांनी पुढाकार घ्यावा. तसंच राष्ट्रीवादीचे जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक यांनीही एक मोहीम सुरू केली आहे. आपली आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यास 5 जणांचा आर्थिक भार केला आपण उचलावा, असं त्यांनी ठरवलं आहे. असंच साऱ्यांनी पुढाकारा घ्यावा", असं आवाहन त्यांनी केलं.

हेही वाचा: १ मे पासून लसीकरण सुरू होणार नाही- राजेश टोपे

"सध्या 45+ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. यात मोठ्या संख्येने लोक येत आहेत. गर्दी होताना दिसत आहे. अशा वेळी ज्यांना लसीकरण करायचं आहे, त्यांनाच बोलवा असं आम्ही सूचवलंय. गर्दी वाढू नये यासाठी प्रयत्न केले पाहिजे असं मुख्यमंत्र्यानीही सांगितलं आहे. तसंच आता तिसऱ्या लाटेबबत चर्चा होत आहे. त्याबाबत सतर्क राहीलं पाहिजे. राज्य सरकार म्हणून आम्ही त्यावर काही उपाय काढूच. पण तिसऱ्या लाटेआधी लसीकरण संपवलं पाहिजे, असं प्लॅनिंग सुरू आहे", असंही त्यांनी सांगितलं.