अफझल समर्थकांपेक्षा काँग्रेस परवडली- शिवसेना

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 27 फेब्रुवारी 2017

शिवसेनेने मुंबई महापालिकेत ऐनवेळी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत.

मुंबई : काँग्रेससोबत जाणार नाही हे सांगून मुख्यमंत्र्यांनी चांगले केले, पण काँग्रेस-राष्ट्रवादीच्या अनेक ओवाळून टाकलेल्या लोकांची भरती करून भाजपची 'काँग्रेस' केली आहे, त्याचे काय? त्यामुळे काँग्रेस परवडली, पण भाजपची सध्या झालेली काँग्रेस महाराष्ट्राला आणि देशाला कुठे घेऊन जाणार, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

शिवसेनेने मुखपत्र 'सामना'मधून भाजपवर टीका केली आहे. 'मेहबुबा मुफ्तींसोबत जाण्यापेक्षा काँग्रेस परवडली,' असे म्हणत शिवसेनेने मुंबई महापालिकेत ऐनवेळी काँग्रेससोबत जाण्याचा पर्याय खुला असल्याचे संकेत दिले आहेत. मुंबई महापालिकेत शिवसेना आणि भाजपला अनुक्रमे 84 आणि 82 अशा जागा मिळाल्याने महापौर पदासाठी सेना-भाजपमध्ये मोठी चुरस आहे. दरम्यान, कोणत्याही स्थितीत काँग्रेससोबत जाणार नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे. त्यानंतर शिवसेनेने 'सामना'मधून वरील टीका केली आहे.

अफझल समर्थकांसोबत सत्ता घातक...
मुख्यमंत्र्यांनी असे बोलायला हवे होते की, ''आम्ही म्हणजेच भाजप काँग्रेससोबत जाणार नाही, पण पाकिस्तानवादी मेहबुबा मुफ्तीसोबत जाणार!'' काँग्रेस नक्कीच संशयास्पद आहे, पण अफझल गुरूसारख्या अतिरेक्यांचे खुले समर्थन करणाऱया मेहबुबा मुफ्तीबरोबर 'सत्ता' उबवणे हे जास्त घातक आहे. अर्थात हा 'घातकी' प्रकार राष्ट्रासाठी केल्याची टिमकी वाजवायला हे मोकळेच आहेत!

अफझल गुरूला काँग्रेस राजवटीत फासावर लटकावले व मेहबुबा मुफ्ती या भाजपबरोबर सत्तेत असताना अफझल गुरूला 'हुतात्मा' वगैरे मानतात हे शिवरायांसमोर मस्तक टेकणाऱयांना चालते काय? अफझल गुरूला शहीद किंवा क्रांतिकारक मानणे म्हणजे अफझलखानास शिवशाहीचे प्रेरणास्थान मानण्यासारखेच आहे, अशी खरमरीत टीका करीत फडणवीस यांच्या युतीबाबतच्या वक्तव्यावरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न शिवसेनेने केला आहे. 
 

Web Title: congress is better than joining mehbooba mufti like bjp