मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे; 'मदरसे बंद'च्या भूमिकेवरून कॉंग्रेसची टीका

मोदींचा ‘सब का विश्वास’ हे ढोंग आहे हे मान्य करावे; 'मदरसे बंद'च्या भूमिकेवरून कॉंग्रेसची टीका

मुंबई ः राज्यातील मदरसे बंद करण्याबाबत भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केलेल्या मागणीसंदर्भात भाजपच्या केंद्रीय व राज्य नेतृत्वाची भूमिका काय आहे हे त्यांनी स्पष्ट करावे असे आव्हान प्रदेश काँग्रेसने दिले आहे. किंबहुना नरेंद्र मोदींच्या भूमिका ढोंगीपणाच्या असतात का याचे उत्तरही चंद्रकांत पाटील व जे. पी. नड्डा यांनी द्यावे, अशी तडाखेबंद टीका प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते व सरचिटणीस सचिन सावंत यांनी आज केली. 

आसाम सरकारने घेतलेल्या अशा निर्णयाचा दाखला देऊन भातखळकर यांनी नुकतीच ही मागणी केली होती. मात्र वाजपेयी सरकारने 2001 मध्ये तसेच दुसऱ्या टर्ममध्ये सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारनेही 2019 मध्ये देशातील मदरशांचा आधुनिकीकरणासाठी निर्णय घेतले होते, असेही सावंत यांनी आज दाखवून दिले. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी सबका विश्वास याबाबत नेहमीच बोलत असतात. पण तो विश्वास त्यांच्या अनेक कार्यक्रमांमुळे ढासळला आहे. आता मोदींच्या भूमिकाही ढोंगीपणाच्या असतात का, या प्रश्नाचे उत्तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा व प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे, अशी टीकाही सावंत यांनी केली. या प्रश्नावर आतापर्यंत भाजपच्या केंद्रीय  नेतृत्वाने घेतलेली भूमिका आणि आता भातखळकर यांनी घेतलेली भूमिका यात विरोधाभास आहे. त्यामुळे अशा भूमिकांना धरबंध घालण्याची इच्छा आहे का, हे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने स्पष्ट करावे. किंवा भातखळकर यांनी स्वतःच्या अधिकारात वरील मत मांडले असेल तर त्यांच्यावर तत्काळ कारवाई व्हावी, असेही सावंत यांनी सांगितले. 

वाजपेयी सरकारने 2001 मध्ये मदरशांच्या आधुनिकीकरणाचा निर्णय घेतला होता. मदरशांच्या तसेच अल्पसंख्यांच्या शिक्षण पद्धतीत हस्तक्षेप करण्यास केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री मुरली मनोहर जोशी यांनीही 2002 मध्ये नकार दिला होता. मदरशांच्या आधुनिकीकरणासाठी सहा कोटी रुपये मंजूरही करण्यात आले होते. गुजरातच्या 2012 च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहिरनाम्यात तसेच 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्या भाजपच्या जाहिरनाम्यातही मदरशांच्या आधुनिकीकरण कार्यक्रमाचा उल्लेख होता. मदरशातील शिक्षकांना गणित, शास्त्र, संगणक असे आधुनिक विषय शिकविण्याची योजना 2019 मध्ये भाजपचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी जाहीर केली होती. त्यामुळे आता भातखळकर यांनी वरील मत मांडताना केंद्रीय नेतृत्वाच्या मताची तमा बाळगली नाही का, याचे स्पष्टीकरण भाजपचे राज्य अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी द्यावे, असेही सावंत यांनी स्पष्ट केले. 

जर हे वरिष्ठ मदरसे बंद करण्याच्या भूमिकेशी सहमत असतील तर मोदींच्या माध्यमातून सांगितला जाणारा सबका विश्वास हा खोटा आहे व भाजपचे राज्य नेते जे म्हणतात ते खरं आहे हे स्पष्ट होईल. अर्थात मदरशांबाबत भाजपचे राष्ट्रीय नेते जे मत मांडतात त्यामागे मुस्लिमांना मुख्य प्रवाहात आणण्याचा त्यांचा हेतू आहे, यावर आमचा काडीचाही विश्वास नाही. त्यांना देशाचे विभाजन करण्यासाठीच अशा मुद्यांचा वापर करायचा आहे हे आम्हाला माहिती आहे, असा टोलाही सावंत यांनी लगावला. 

राज्यातील अशा वक्तव्यांमधून भाजपचा दुटप्पीपणाच दिसतो, सत्ता गेल्यापासून त्यांचा ताळतंत्र सुटला आहे, त्यांना मानसोपचारांची गरज आहे. सत्तेच्या हव्यासापोटी ते महाराष्ट्राचा व मुंबई पोलिसांचा अपमान करण्यासारखे खालच्या पातळीचे राजकारण करीत आहेत. कोरोनामुळे ढासळलेल्या अर्थव्यवस्थेकडून इतरत्र लक्ष वेधण्यासाठी अशी विधाने केली जातात. मात्र अशा विधानांमधून पक्षाचे चारित्र्यच दिसते, अशी जळजळीत टीकाही सावंत यांनी केली.

-------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com