निरुपमांच्या अडेलतट्टूपणानेच कॉंग्रसचा पराभव - कामत

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 24 फेब्रुवारी 2017

मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

मुंबई - मुंबई कॉंग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांनी आयत्या वेळी उमेदवारांच्या यादीत फेरफार केले. त्यामुळेच पक्षाचा दारुण पराभव झाला, असा आरोप कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते गुरुदास कामत यांनी "सकाळ'शी बोलताना केला. निरुपम यांचा अडेल स्वभावही पराभवाला कारणीभूत ठरला, अशी पुष्टीही त्यांनी जोडली.

अंतर्गत वादामुळे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कॉंग्रेसला मोठा फटका बसला आहे. गेल्या महापालिका निवडणुकीतील जागांच्या तुलनेत कॉंग्रेसचा 21 जागांवर पराभव झाला आहे. कॉंग्रेसला 31 जागांवरच सामाधान मानावे लागले.

मुंबई महापालिका निवडणुकीतील पराभवामुळे कामत यांनी निरुपम यांच्यावर टीका केली आहे. "मुंबई महानगरपालिका निवडणुकीतील पक्षाच्या उमेदवारांची अंतिम यादी तयार करण्यासाठी ज्येष्ठ नेते भूपिंदरसिंह हुडा यांना पक्षाने मुंबईत पाठवले होते. हुडा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुंबई अध्यक्ष निरुपम, मी आणि अन्य ज्येष्ठ नेते उपस्थित होतो. हुडा दोन फेब्रुवारीला उमेदवारांची यादी अंतिम करून दिल्लीला रवाना झाले. ते जाताच निरुपम यांनी या यादीत अनेक मनमानी बदल केले,' असा आरोप कामत यांनी केला.

निरुपम यादीत फेरफार करतील याची कुणकुण होती. म्हणूनच हुडा यांना मुंबईत थांबण्याचा आग्रह आपण केला होता, अशी माहितीही कामत यांनी दिली. यादीतील फेरफारचे उदाहरण देताना कामत यांनी चंगेज मुल्तानी या माजी नगरसेवकाचा संदर्भ दिला. अनेकांची उमेदवारी आयत्या वेळी बदलल्याने पक्षाला फटका बसला, असेही कामत यांनी स्पष्ट केले.

निरुपम यांच्याशी संपर्क नाही
मुंबईच्या निकालानंतर निरुपम यांनी पक्षश्रेष्ठींकडे राजीनामा दिला. "कॉंग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारत राजीनामा देत आहे. कॉंग्रेसचे सर्व नेते मला हरवण्यासाठी लढले,' अशी प्रतिक्रिया निरुपम यांनी व्यक्त केली. यादीत फेरफार केल्याच्या कामत यांच्या आरोपाबाबत प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न केला; पण तो होऊ शकला नाही.

Web Title: congress loss by sanjay nirupam