नाना पटोलेंच्या आरोपांवर काँग्रेसचा राष्ट्रीय नेता म्हणतो... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Nana Patole

नाना पटोलेंच्या आरोपांवर काँग्रेसचा राष्ट्रीय नेता म्हणतो...

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरही केलं महत्त्वपूर्ण भाष्य

--------------------------------------

मुंबई: अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सेक्रेटरी आणि महाराष्ट्र प्रभारी एच के पाटील (H K Patil) यांनी राज्यातील काँग्रेसच्या (Congress) महत्वाच्या नेत्यांसोबत आज बैठक (Meeting) घेतली. या बैठकीदरम्यान आगामी निवडणुकीसंदर्भात (Upcoming Elections) चर्चा झाल्याची माहिती त्यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत (Press Conference) दिली. त्यावेळी त्यांनी जिल्हा पातळीवर पुनर्बांधणी केली जाईल असं सांगितलं. यावेळी नाना पटोले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर केलेल्या आरोपाबाबत एच के पाटील यांनी वक्तव्य केलं. (Congress National Leader HK Patil reaction on Nana Patole Claims against Shivsena NCP)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्यावर पाळत ठेवल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दोन दिवसांपूर्वी पक्षाच्या एका कार्यक्रमात केला. काँग्रेस स्वबळावर लढणार असल्याने दोन पक्ष आपल्याला त्रास देतील असेही ते म्हणाले. त्यांच्या या विधानांवरून राजकीय वातावरण काहीसं तणावपूर्ण झालं होतं. त्याबाबत एच के पाटील यांनी वक्तव्य केलं. "प्रदेशाध्यक्षांनी केलेले वक्तव्य आणि केलेले आरोप योग्य नव्हते. त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण लगेचच दिले होते. पण काही लोकांनी त्यांना हवं त्याप्रकारे त्यांच्या तोंडी वाक्य टाकलंय. त्यांना केंद्र सरकार म्हणायचं होतं, पण वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला", असं स्पष्टीकरण त्यांनी दिले.

"आम्ही शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत सत्तास्थापना केली आहे.आम्ही धर्माचं राजकारण करत नाही. आमचे विचार आम्हाला तशाप्रकारचे काम करण्याची परवानगी देत नाही. अशा वेळी आम्ही तिघेही नीट सरकार चालवतो. समान किमान कार्यक्रमावर सध्याचे सरकार आहे. कोणत्याही चुकीच्या गोष्टी परसल्या तर त्याने वितुष्ट येते. तसं होऊ नये यासाठी बैठका घेऊन चर्चा करू", असेही ते म्हणाले.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत...

"अध्यक्षपद आमच्याकडे आहे. आमचे इतर सोबतचे पक्ष आहेत. पण हे पद आमच्याकडे आहे आणि राहिल. सध्या निवडणूक पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला कारण कोरोनाचा प्रभाव अद्याप संपलेला नाही", असे पाटील यांनी स्पष्ट केले.