कॉंग्रेस, राष्ट्रवादी आणि समाजवादी एकत्र येणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 मार्च 2017

शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता
मुंबई - मुंबई पालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष, अशी नवी आघाडी उदयास येणार आहे. तसे झाल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता
मुंबई - मुंबई पालिकेत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्ष, अशी नवी आघाडी उदयास येणार आहे. तसे झाल्यास महापौरपदाच्या निवडणुकीत शिवसेनेला फायदा होण्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि समाजवादी पक्षाने पालिकेत धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी एकत्र यावे, अशी भूमिका घेत कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी या आघाडीसाठी पुढाकार घेतला आहे. कॉंग्रेसचे पालिकेतील गटनेते रवी राजा आणि मुंबई कॉंग्रेसचे सरचिटणीस संजय कोंडविलकर यांनी तसे आवाहन करणारे पत्र शुक्रवारी (ता.3) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुंबई अध्यक्ष सचिन अहिर आणि समाजवादी पक्षाचे मुंबई अध्यक्ष अबू आझमी यांना दिले. दरम्यान, कॉंग्रेसही महापौरपदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचे समजते.

रंगणार आकड्यांचा खेळ
अखिल भारतीय सेनेच्या नगरसेविका गीता गवळी यांनी भाजपला पाठिंबा दिल्याने त्या पक्षाचे संख्याबळ 83 वर पोचले. आता भाजप आणि शिवसेनेच्या संख्याबळात केवळ सहाचे अंतर उरले आहे. आठ मार्चला महापौरपदाची निवडणूक होणार आहे. त्यामुळे पालिकेत आकड्यांचा खेळ रंगणार आहे.

भाजपने शुक्रवारी आपल्या नगरसेवकांच्या गटाची बेलापूर येथील कोकण आयुक्तांकडे नोंद केली. शिवसेनेने काही दिवसांपूर्वीच 84 नगरसेवक आणि 4 अपक्षांसह आपल्या गटाची नोंद केली आहे.

कॉंग्रेसच्या गटनेतेपदी रवी राजा
कॉंग्रेसच्या गटनेतेपदी रवी राजा यांची निवड झाली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कॉंग्रेसच्या 31 नगरसेवकांच्या गटाची गुरुवारी कोकण भवनात नोंद करण्यात आली. रवी राजा हे पालिकेतील ज्येष्ठ आणि अभ्यासू सदस्य असून बेस्ट समितीतही त्यांनी पक्षाचे नेतृत्व केले होते.

कोटक यांचा पत्ता कट
भाजपच्या गटनेतेपदी मनोज कोटक यांची निवड झाली आहे. कोटक यांच्या रूपाने भाजपने मराठी चेहरा दिला असला तरी गटनेतेपद देऊन पक्षाने त्यांचा महापौरपदासाठीचा पत्ता कापला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरपदासाठी भाजप मराठी चेहरा देणार का, अशी चर्चा आता रंगली आहे.

Web Title: congress, ncp & samajwadi jointly