मुंबई कॉंग्रेसमध्ये बंडाचा झेंडा 

सकाळ न्यूज नेटवर्क
मंगळवार, 24 जानेवारी 2017

मुंबई - महापालिका निवडणुकीत अस्तिवाची लढाई लढणाऱ्या मुंबई कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी कॉंग्रेसच्याच बड्या नेत्यांनी सुरू केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कॉंग्रेस गटबाजीच्या चक्रव्यूहात अडकली असून, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा शिष्टाई करण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

मुंबई - महापालिका निवडणुकीत अस्तिवाची लढाई लढणाऱ्या मुंबई कॉंग्रेसमध्ये अध्यक्ष संजय निरुपम यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकवण्याची तयारी कॉंग्रेसच्याच बड्या नेत्यांनी सुरू केली आहे. यामुळे ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुंबई कॉंग्रेस गटबाजीच्या चक्रव्यूहात अडकली असून, हरियानाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंह हुडा शिष्टाई करण्यासाठी मुंबईत दाखल होणार आहेत. दरम्यान, कॉंग्रेसचे निष्ठावंत माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी संजय निरुपम यांच्या कार्यपद्धतीवर आरोप करत थेट भाजपमध्ये प्रवेश केला. हेगडे हे माजी खासदार प्रिया दत्त यांचे कट्टर समर्थक असून त्यांचे घराणे कॉंग्रेसचे निष्ठावंत घराणे म्हणून परिचित होते. 

मुंबई कॉंग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्या एकाधिकारशाहीच्या कार्यपद्धतीवर कॉंग्रेसच्या बड्या नेत्यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. मुंबईत कामत व देवरा या गटाचे वर्चस्व आहे. मात्र, निवडणुकीला हे दोन्ही गट समन्वयाने सामोरे जात असल्याचे आजपर्यंत चित्र होते. आता मात्र या दोन्ही गटांकडून संजय निरुपम यांना लक्ष्य करण्यात आले असून, कामत यांनी तर संपूर्ण प्रचारातून बाहेर राहणार असल्याचे कार्यकर्त्यांना कळवले आहे. 

देशभरात कॉंग्रेसची दयनीय स्थिती असतानाच मुंबईत अंतर्गत गटबाजीमुळे कॉंग्रेस कार्यकर्ते हवालदिल झाले असून, तातडीने यावर तोडगा काढण्याची मागणी नेते व पदाधिकाऱ्यांनी पक्षश्रेष्ठींकडे केली आहे. कॉंग्रेस पक्षश्रेष्ठींनी संजय निरुपम व गुरुदास कामत यांच्यात समेट घडविण्यासाठी हुडा यांची नियुक्‍ती केल्याची माहिती कामत यांनी दिली. 

संजय निरुपम यांनी त्यांच्यावर होत असलेले आरोप फेटाळून लावले आहेत. मुंबई कॉंग्रेसमध्ये पहिल्यांदाच लोकशाही पद्धती आणल्याचा दावा निरुपम यांनी केला. आजपर्यंत मुंबई कॉंग्रेसमध्ये कधीही विविध समित्यांची स्थापना केलेली नव्हती. मुंबईचा अध्यक्ष नागरिकांना भेटत नव्हता. मी मात्र अध्यक्षपदाची धुरा घेतल्यापासून गल्लीबोळात फिरत आहे. अनेक समित्यांची स्थापना केली आहे. सध्या कॉंग्रेससची पहिली लढाई भाजप व शिवसेनेसोबत असून, या संपूर्ण गटबाजीच्या राजकारणावर मी निवडणुकीनंतर बोलणार असल्याचे निरुपम यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Congress rebel in Mumbai