मुंबईत शौचालय बांधणीचा वेग मंदावला, येत्या दोन वर्षात 22 हजार शौचालय बांधणीचं उद्दिष्ट

मुंबईत शौचालय बांधणीचा वेग मंदावला, येत्या दोन वर्षात 22 हजार शौचालय बांधणीचं उद्दिष्ट

मुंबई:  मुंबईत 2022 पर्यंत 22 हजार शौचालय बांधण्याची घोषणा मुंबई महापालिकेने केली होती. मात्र ही महत्वाकांक्षी योजना केवळ कागदावर राहिली आहे. यापैकी केवळ 20 टक्के शौचालय आजपर्यंत बांधण्यात आली आहेत. ही योजना कासव गतीने सुरु असल्याचा आरोप सपाचे नगरसेवक रईस शेख यांनी केला आहे. या प्रकल्पाची प्रगती जाणून घेण्यासाठी कुठलीही यंत्रणा उभारली नसल्याचा आरोपही त्यांनी पत्राद्वारे केला आहे.

कोविड काळात धारावीसारख्या जास्त गर्दीच्या वस्त्यांमध्ये कोरोना फैलावण्यास गर्दीयुक्त सार्वजनिक शौचालयेही कारणीभूत ठरली होती. दुसरीकडे सार्वजनिक शौचालयांवर अधिक लोकसंख्येचा भार येत असल्यामुळे मुंबईत टॉयलेट खचून मृत्यूमुखी पडण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.

मुंबईत लोकसंख्येच्या तुलनेत शौचालयांची संख्या तुटपुंजी आहे.  2018 मध्ये पालिकेने शहरात शौचालयाची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या अंतर्गत 2022 पर्यंत शहरातील वेगवेगळ्या भागात सुमारे 22 हजार शौचालये बांधण्याचे उद्दिष्ट पालिकेचे होते. यासाठी 700 कोटी रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात आतापर्यंत या प्रकल्पातील केवळ 20 टक्के शौचालये बांधली असल्याचा आरोप सपाचे गटनेते रईस शेख यांनी केला आहे. तत्कालीन पालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी सर्व शौचालयांचा वापर मोफत करु देण्यात येईल असे आश्वासनही दिलं होतं, याची आठवणही रईस शेख यांनी पत्र लिहून करुन दिली आहे.

सार्वजनिक शौचालयावर मुंबई पालिका प्रशासनाचे कुठलेही स्पष्ट धोरण नाही. शहरात सार्वजनिक शौचालये पुरेसे नसल्यामुळे महिला आणि दिव्यांग लोकांची फरफट होते. सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था महत्वाची आहे. मात्र याकडे पालिका प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचे रईस शेख यांनी या पत्रात म्हटलंय.

मुंबईतील अनेक भागात प्रती माणसी शौचालयाचे प्रमाण अंत्यत कमी असल्याची आकडेवारी  अपनालय या सामाजिक संस्थेने जारी केली होती. यामध्ये शिवाजी नगर, मानखुर्द या भागात 145 व्यक्तीमागे एक शौचालय असल्याची माहिती समोर आली होती. धारावीमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 25 व्यक्तीमागे 1 शौचालय उपलब्ध करण्याचा विचार होता. दुसरीकडे अनेक दाटीवाटीच्या वस्तीत शौचालयाची संख्या कमी असल्यामुळे शौचालयांवर भार येतो. त्यामुळे अलीकडे शौचालये कोसळून जीव गमावण्याच्या संख्येत वाढ होत असल्याच्या घटना वाढताहेत. नुकतेच कुर्ल्यात शौचालय कोसळून एका महिलेचा मृत्यू झाला होता. या घटनेत एका मोडकळीस आलेल्या शौचालयात या महिलेला नाईलाजाने जावे लागले होते.

पालिका प्रशासनाची ही उदासिनता आहे. शौचालयांच्या समस्येकडे सामाजिक, लिंग आणि आर्थिक दृष्टिकोनातून बघणे फार महत्वाचे आहे. ग्रामीण भागाप्रमाणे शहरात देखील सार्वजनिक सौचालयांऐवजी घराघरात सौचालये बांधण्यावर भर देणे गरजेचे होते, मात्र असा प्रयत्न होतांना दिसत नसल्याचे सांगत अनेक ठिकाणी अपघात तर कोरोनासारख्या महामारीचा अनेक अडचणींचा सामना आपल्याया करावा लागला असल्याचे राईट टू पी चळवळीत कार्यकर्त्या उषा काळे यांनी सांगितले.

शौचालये बांधण्याचे काम सुरू असून मी त्याकडे वैयक्तिक लक्ष देऊन आहे. अजूनही 2022 पर्यंत शौचालय बांधण्याचे उद्दीष्ट पुर्ण होउ शकते. सध्या नेमकी काय परिस्थिती आहे त्याची माहिती घेतली जाईल अशी प्रतिक्रिया महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली.

----------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

construction toilets Mumbai slowed down with target 22 thousand toilets next two years

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com