esakal | BLOG - 'कंटेजियन' ९ वर्षांपूर्वीच बनलेला 'कोरोना'वर आधारित हुबेहुब चित्रपट....
sakal

बोलून बातमी शोधा

BLOG - 'कंटेजियन' ९ वर्षांपूर्वीच बनलेला 'कोरोना'वर आधारित हुबेहुब चित्रपट....

"क्वारंटाईन, एपिडेमीक, लॉकडाऊन, एन-९५ या आताशी आपल्याला ओळख पटलेल्या तांत्रिक नावांच्या वापरापासून ते प्रवासावर आलेल्या बंदीपर्यंत आणि किराणामालाच्या दुकानात लागणाऱ्या रांगांपासून ते आरोग्यव्यवस्थेच्या अस्ताव्यस्ततेपर्यंतच्या सर्व घटनांचे अगदी हुबेहुबे चित्रण स्टिव्हन यांनी 'या' चित्रपटात उभे केले आहे.

BLOG - 'कंटेजियन' ९ वर्षांपूर्वीच बनलेला 'कोरोना'वर आधारित हुबेहुब चित्रपट....

sakal_logo
By
- राहुल गडपाले

तुम्ही ज्या बसच्या खांबाचा आधार घेऊन उभे आहात तो खांब, हॉटेलमधला सरबताचा पेला, पैशाची देवाणघेवाण करताना आणि वाणसामान आणताना तुमचा दुकानदाराशी आणि तदनुषंगीक गोष्टींशी आलेला संपर्क, या आणि अशा कित्येक प्रकारच्या स्पर्शातून पसरत जाणारा रोग. खोकला, सर्दीसारखी लक्षणे, श्वास घेताना होणारा त्रास, तुम्हाला आलेली शिंक आणि त्यातून इतरांनाही होत असलेली रोगाची लागण… तुम्हाला वाटत असेल मी कोरोना किंवा कोविड-१९ बद्दल बोलतोय. पण तसं नाहीये, या आणि अशा प्रकारच्या रोगाचं भाकित कुणीतरी केलं होतं आणि हे भाकित करणारी व्यक्ती कुणी वैज्ञानिक किंवा संशोधक नव्हती तर तो होता एक चित्रपट. विशेष म्हणजे त्या कथानकातही चीन हेच त्या रोगाच उगमस्थान दाखवण्यात आलं होतं.

कोरोना या विषाणुमुळे उद्भवलेली परिस्थिती आणि त्यातून अस्ताव्यस्त झालेला माणूस आज वर्तमानातल्या भयक्रांत परिघाचा सामना करीत असताना भूतकाळातही कुणीतरी या आणि अशाच प्रकारच्या परिस्थितीचा विचार केला असेल असे एरवी चुकूनही कुणाच्या मनात आले नसते. पण, तसं झालंय आणि तेही २०११ मध्ये. आजपासुन तब्बल नऊ वर्षांपूर्वी या आणि अगदी अशाच स्वरुपाच्या परिस्थितीची कल्पना कुणीतरी केली होती आणि तीदेखील चित्रपटाच्या रुपात. जणू वर्तमानच ते.

Thank You मुंबई पोलिस ! गोरगरीब, झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्यांसाठी मुंबई पोलिसांचं मिशन भूक

या परिस्थितीमुळे उद्भवलेल्या समस्या, त्यासाठी लढणाऱ्या वैज्ञानिकांच्या कसोट्या, ज्या देशातून या रोगाचा फैलाव झाला त्या आणि तशाच काहीशा बलाढ्य देशांची त्या परिस्थितीतही स्वतःला वरचढ ठरविण्याची लढाई, असा कसोशीचा संघर्ष आणि तोही आजच्या परिस्थितीशी तंतोतंत जुळेल असाच चित्रीत केला गेला होता. २०११ मध्ये स्टिव्हन सोडरबर्गने तयार केलेल्या कंटेजियन या चित्रपटात आज आपल्यासमोर उभ्या राहिलेल्या या परिस्थितीचे अगदी खरेखुरे वाटेल असे चित्रण केलेले आहे. क्वारंटाईन, एपिडेमीक, लॉकडाऊन, एन-९५ या आताशी आपल्याला ओळख पटलेल्या तांत्रिक नावांच्या वापरापासून ते प्रवासावर आलेल्या बंदीपर्यंत आणि किराणामालाच्या दुकानात लागणाऱ्या रांगांपासून ते आरोग्यव्यवस्थेच्या अस्ताव्यस्ततेपर्यंतच्या सर्व घटनांचे अगदी हुबेहुबे चित्रण स्टिव्हन यांनी या चित्रपटात उभे केले आहे. यात दाखवलेली सामाजिक आणि राजकीय संघर्षाची किनारदेखील जणुकाही आजच्याच वास्तववादी जीवनाचाच आपल्याला प्रत्यय करुन देतेय. ‘ब्लास्ट फ्रॉम द पास्ट’ म्हणावं तसंच काहीस हा चित्रपट पाहताना वाटतं.  

२००२ मध्ये उगवलेला सार्स आणि २००९ मध्ये पोटात भीतीचा गोळा उठवणारा स्वाईन फ्लू या दोनही घटनांनी तशी येऊ घातलेल्या संकटांची थोडी का होईना कल्पना दिली होतीच. त्यापासून जगाने काही धडे घेतले असोत किंवा नसोत; मात्र भूतकाळातून भविष्याच्या वर्तमानाची पुढे येऊ घातलेली ही चिंता चित्रपट वेड्यांनी मात्र अगदीच उत्तमरित्या ओळखली होती, असेच म्हणायला लागेल. चित्रपट किंवा कंटेटच्या जगात काम करणारे लोक कायमच कल्पनांच्या भराऱ्या घेत असतात. सर्वसामान्यतः माणसाला कल्पनेच्या जगात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टींमध्ये रमायला आवडतं. रहस्यकथा, दुसऱ्या ग्रहावरील जग, आपल्यासारखं या जगात दुसरं कोणी असेल या आणि अशा प्रकारच्या कुतूहलाचे प्रयोग नेहमीच चित्रपटांमधून दाखवले जातात. त्यात सत्य आणि कल्पनारंजनात असलेली दरी कशीही असली तरीही हे चित्रपट मानवी मनांचा आरसा आहेत, असंच आपल्याला वाटत राहतं.

मोठी बातमी - काय 20 एप्रिलनंतर घरपोच मद्य विक्री? एक मिनिट, आधी ही बातमी वाचा... 

स्टिव्हन यांनी कंटेजियनमधून मांडलेली कथा तब्बल नऊ वर्षांपूर्वीची आहे खरी, पण वाटते अशी जशी आताच घडतेय. बेथ इमहॉफ आणि तिच्या मुलाच्या मृत्युपासून या रोगाची साखळी सुरु होते. अमेरिकेचे सेंटर फॉर डिसीज सेंटर (सीडीसी) या रोगाची पाळेमुळे शोधून काढण्याची तयारी करायला सुरुवात करतात आणि तोपर्यंत हा..हा म्हणता रोगाचा वेगाने फैलाव होत जातो. बेथ एका कामानिमित्त हॉंगकॉंगला गेलेली असते. तेथे ती अनेकांना भेटते. तिचा पूर्वाश्रमीचा प्रियकर हा देखील याच शहरात राहत असतो. तिच्या कामाच्या गराड्यात ती अनेकांना भेटते, त्यांच्याशी बोलते, चुंबनं देते आणि चीनमधल्याच एका हॉटेलमध्ये पोर्कचे सेवन करते. पदार्थ आवडल्यावर ती त्या शेफला भेटून ती डिश चांगली झाल्याचे सांगत त्याच्यासोबत सेल्फीदेखील काढायला विसरत नाही. ती ज्या पेल्यातून सरबत पिते तो पेला, तो वेटर, हॉटेलाचे बिल स्वाईप करून घेणारा हॉटेलचा मॅनेजर, असे अनेकजण तिच्या संपर्कात येतात. त्या हॉटेलमधल्या एका रशियन मुलीशीदेखील तिचा संपर्क येतो आणि त्याच माध्यमातून हा रोग जगभर पसरत जातो. बेथने ज्या प्राण्याचे मांस खाल्ले असते त्या प्राण्याचा आणि वटवाघुळाचा संपर्क आलेला असतो आणि त्यातून तो रोग बेथपर्यंत येऊन पोचतो. या दरम्यान बेथ आपल्या पूर्वाश्रमीच्या प्रियकराला भेटण्यासाठी तिच्या विमानाची वेळदेखील बदलून घेते. त्यामुळे क्वारंटाईन केलेल्या तिच्या नवऱ्याच्या मनात तिच्या या चुकीमुळे आपल्याला आणि आपल्या मुलांना हा त्रास भोगावा लागत असल्याची भावना निर्माण होते.

ही सर्व परिस्थिती हाताळणाऱ्या आरोग्य यंत्रणेच्या अधिकाऱ्यांच्या कामचे कौतुक तर करायलाच हवे मात्र त्यासोबतच त्यांनादेखील त्यांच्या आयुष्याची असलेली भावनिक किनार आजच्या परिस्थितीत आपल्यासाठी कोरोनाशी झगडणाऱ्या डॉक्टरांच्या त्यागाची जाणीव करुन देते. बहुदा असे चित्रपट आपण निव्वळ मनोरंजन म्हणून पाहतो. त्यामागे आपल्या मनात एक प्रकारची निश्चितता असते की हा केवळ एक काल्पनिक देखावा आहे आणि खरे आयुष्य यापासून कोसो दूर आहे. पण हा चित्रपट जणु आजच्याच परिस्थितीचे वास्तववादी चित्रण आहे, असे सतत वाटत राहते.  

मोठी बातमी -  खुशखबर ! बांधकाम कामगारांच्या थेट खात्यात येणार 'इतके' पैसे 

रोगाचा वाढत जाणारा फैलाव रोखण्यासाठी धडाधड खाली होत चाललेली कार्यालये, शॉपींग मॉलच्या बाहेर लागलेल्या रांगा, औषधांच्या दुकानात उडालेली झुंबड आणि स्थलांतरीतांना तसेच घरे नसलेल्या लोकांची खाण्याच्या वस्तू मिळवण्यासाठी चाललेली झुंबडदेखील आजच्या परिस्थितीशी अगदीच मिळतीजुळती आहे. स्टिव्हन सोडनबर्ग यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाची कथा लिहीलीये स्कॉट बर्न यांनी. २०११ मध्ये पडद्यावर आलेल्या या चित्रपटाने बॉक्स अॉफीसवर १३.५५ कोटी अमेरिकन डॉलरची कमाई केली होती आणि आता कोरोनाच्या पार्श्वभूमिवर लोक मोठ्या प्रमाणात हा चित्रपट पुन्हा पाहताहेत… अॅमेझॉन प्राईमवर तुम्हाला हा चित्रपट पाहता येऊ शकेल. कल्पनेच्या विश्वातली एक कथा आपल्यासमोर कधी वास्तवात येईल, असा विचारही कधी कुणी करू शकेल आणि त्यातली तत्थ्येही इतकी मिळतीजुळती असतील हा निव्वळ योगायोग मानावा का, याचे उत्तर मात्र यातून मिळणे कठीण आहे.

contagion a film based on corona outbreak released 9 years back blog by rahul gadapale 

loading image
go to top