वाहतूक नियंत्रक पोलिसाला कंटेनरची धडक 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 नोव्हेंबर 2019

उरण तालुक्‍यात जेएनपीटी बंदरामुळे होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीला सुरळीत करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने उडवल्याची घटना समोर आली आहे.

उरण : उरण तालुक्‍यात जेएनपीटी बंदरामुळे होत असलेल्या प्रचंड वाहतूक कोंडीला सुरळीत करणाऱ्या वाहतूक पोलिसालाच भरधाव वेगात आलेल्या कंटेनरने उडवल्याची घटना समोर आली आहे. रमेश शंकर घुगरे (35) असे अपघात झालेल्या वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याचे नाव आहे. त्यांच्या पायाचे आणि मांडीचे हाड निकामी झाले आहे. घटनेनंतर कंटेनरचा चालक आरोपी बिर्जुदेव जगन्नाथ कुकडे याला पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. 

1987 मध्ये जेएनपीटी बंदर कार्यान्वित झाले आहे. त्यानुसार मागील 30 वर्षांत उरणमध्ये अवजड वाहनांची वाहतूक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या महामार्गावर वारंवार अपघात होत असून यात निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. असे असतानाही या अपघातांवर ठोस अशा कोणत्याही उपाययोजना अजूनपर्यंत जेएनपीटी प्रशासनाने केलेल्या नाहीत.

बंदराकडे जाणाऱ्या रस्त्यांवरूनच सामान्यांना प्रवास करावा लागत असून मागील तीन वर्षांपासून नागरिक वाहतुकीसाठी स्वतंत्र मार्गिका व सहा आणि आठ पदरी रस्ते बनविण्याचे काम सुरू आहे; मात्र हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू असून, उड्डाणपुलांचीही कामे अर्धवट अवस्थेतच असल्याने प्रचंड वाहतूक कोंडी आणि अपघात या समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. यासाठी येथील प्रकल्पग्रस्त आणि स्थानिक नागरिक वेळोवेळी मोर्चे, आंदोलने, उपोषणे आदींचा अवलंब करूनदेखील जेएनपीटी प्रशासन कोणत्याच उपाययोजना करीत नाही. 
 

उरण तालुक्‍यात अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी विविध प्रकारच्या उपाययोजना सुरू आहेत. त्याचप्रमाणे बेशिस्त वाहन चालविणाऱ्यांवर वाहतूक पोलिसांचे बारीक लक्ष असून, शिस्तीचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करणे सुरू आहे. याचाच राग मनात धरून काही चालक अशी कृत्ये करत आहेत; परंतु काही महिन्यातच आम्ही वाहतूक कोंडी कमी करू. 
- माणिक नलावडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, 
उरण वाहतूक शाखा  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Container beated the traffic controller police