खारघरच्या हवेवर लक्ष; गुणवत्ता तपासणी यंत्रणा लवकरच 

दीपक घरत
Tuesday, 20 October 2020

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रायगड प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी सांगितले की, खारघरमध्ये हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या समस्येवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. सिडकोने यासाठी मदत केली आहे. 
 

पनवेल : वायुप्रदूषणामुळे खारघर येतील रहिवाशी हैराण झाले आहेत. त्यामुळे आता या उपनगरात हवेची गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा बसवण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतला आहे. यासाठी आवश्‍यक भूखंडाचा ना हरकत दाखला सिडकोने दिला आहे. 

हे वाचा : रेमडेसिवीर कोरोनासाठी कुचकामी 

पनवेल महापालिकेच्या शेजारी असलेल्या नवी मुंबई पालिका हद्दीत हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा आहे. याच धर्तीवर खारघरमध्ये प्रदूषणाची मोजमाप करणारी यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. 
तळोजा औद्योगिक वसाहत परिसरातील कारखान्यातून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे खारघर आणि तळोजात सर्वाधिक प्रदूषण होते. या प्रश्‍नावर नागरिक आक्रमक आहेत. 

हे वाचा : किशोरी पेडणेकर यांच्या अडचणी वाढणार

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे रायगड प्रादेशिक अधिकारी जगन्नाथ साळुंखे यांनी सांगितले की, खारघरमध्ये हवेची गुणवत्ता तपासणारी यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर या समस्येवर लक्ष ठेवणे सोपे होणार आहे. सिडकोने यासाठी मदत केली आहे. 

सुमारे 60 लाख रुपयांचा खर्च 
हवेची गुणवत्ता तपासणी करणारी यंत्रणा बसवण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला सुमारे 60 लाख रुपये खर्च येणार आहे. या यंत्रणेमुळे हवेमध्ये कोणकोणते प्रदूषणकारी घटक आहेत आणि त्याचे प्रमाण किती आहे याची माहिती मिळणार आहे. हे घटक कोणत्या भागातील कारखान्यातून सोडण्यात येतात, ही माहिती घेणे शक्‍य होणार आहे. 

महापालिकेचा प्रस्ताव धूळ खात 
महापालिका हद्दीत दोन ठिकाणी प्रदूषण मोजमाप करणारी यंत्रणा बसवण्याचा प्रस्ताव महापालिकेचे तत्कालीन आयुक्त गणेश देशमुख यांनी तयार केला होता. यासाठी प्रदूषण मोजणारी यंत्रणा कशी काम करते आणि कुठल्या प्रकारची यंत्रणा बसवणे योग्य होईल याची माहिती देण्याची विनंती प्रदूषण नियंत्रण मंडळाला केली होती. मात्र ही माहिती महापालिकेला उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे हा प्रस्ताव रखडला असल्याची माहिती उपयुक्त संजय शिंदे यांनी दिली. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Continuous ambient air quality monitoring system in Kharghar