कंत्राटी कामगारांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 ऑगस्ट 2019

महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.७) पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ‘

नवी मुंबई ः महापालिकेच्या विविध विभागांत कंत्राटी पद्धतीवर काम करणाऱ्या कामगारांनी आपल्या प्रलंबित मागण्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी (ता.७) पालिका मुख्यालयावर मोर्चा काढला. ‘समाज समता कामगार संघा’च्या नेतृत्वाखाली हजारो कंत्राटी कामगार या मोर्चात सहभागी झाले होते. या वेळी कामगारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार न केल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे.

कामगारांना अर्थसंकल्पातील तरतुदीप्रमाणे १४ महिन्यांची थकबाकी त्वरित वाटप करण्यात यावी. नवी मुंबई महापालिकेत कार्यरत असणाऱ्या एकूण ६,२७७ कामगारांपैकी साधारण ७०० कामगार कचरा वाहतुकीचे काम करतात. या कामगारांना उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार किमान वेतन ऑक्‍टोबर २०१८ पासून लागू करण्यात आले आहे.

मात्र उच्च न्यायालयाने दिलेली १६ आठवड्यांची मुदत फेब्रुवारी २०१९ मध्ये संपुष्टात आल्याने, कचरा वाहतूक कामगारांच्या किमान वेतन थकबाकी वाटपाबाबत पालिका उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करीत असल्याची नाराजी कामगार वर्गाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे या कचरा वाहतूक कामगारांना ४३ महिन्यांची थकबाकी त्वरित वाटप करण्यात यावी. याशिवाय तांत्रिक अडचणींमुळे जिओ फेन्सिंगमुळे कामगारांचे नाहक आर्थिक नुकसान होत असून, कामगारांचे वेतन जिओ फेन्सिंग वॉच आणि बायोमेट्रिक मशीनचा ताळमेळ घेऊन करण्यात यावे, अशी मागणी या वेळी मोर्चेकऱ्यांकडून करण्यात आली. 

बेलापूर विभाग कार्यालयातील कामगारांना जिओ फेन्सिंग वॉचमधील त्रुटीमुळे कमी दिलेले वेतन त्वरित मिळावे. याशिवाय कामगारांच्या मागण्या पालिका प्रशासनाने गांभीर्याने सोडवाव्यात; अन्यथा आमरण उपोषण करण्यात येईल. 
- मंगेश लाड, सरचिटणीस, समाज समता कामगार संघ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Contract workers' march to Navi Mumbai Municipal Corporation