अस्वच्छतेच्या ठेकेदाराला ५ लाखांचा दंड

N.-Ramaswami
N.-Ramaswami

नवी मुंबई - सार्वजनिक स्वच्छतागृहांतील अस्वच्छता, अंगावर शिरशिरी आणणारी तेथील दुर्गंधी, नैसर्गिक हाकेला ओ देण्यासाठी केवळ अगतिकतेतून तोंडाला रुमाल बांधून, नाक मुठीत धरून नागरिकांना तेथे जावे लागते, हा तुम्हा-आम्हाला येणारा सार्वत्रिक अनुभव! याबाबत ढिगभर तक्रारींनंतरही संबंधित यंत्रणांकडून दुर्लक्ष होत असल्याने ‘अस्वच्छते’च्या या ठेकेदारांचे फावते. नवी मुंबई पालिकेचे आयुक्त डॉ. एन. रामास्वामी यांनाही नुकताच सर्वसामान्यांना सामोरे जावे लागणाऱ्या या अनुभवाला नेरूळमध्ये सामोरे जावे लागले. या स्वच्छतागृहात स्वच्छता सोडाच; तेथे हात धुण्यासाठी साबणही नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्याची गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित ठेकेदाराला पाच लाखांचा दंड ठोठावला. असा प्रकार यापुढे खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी या वेळी पालिका हद्दीतील स्वच्छतागृहांच्या ठेकेदारांना दिला.

नेरूळ सेक्‍टर १९ ए येथील महापालिकेच्या वंडर पार्क उद्यानाच्या ठेकेदाराला हा दंड ठोठावण्यात आला. या उद्यानाची तसेच  तेथील स्वच्छतागृहाची देखभाल-दुरुस्तीचे कंत्राट ‘अश्‍विनी इन्फ्रा’ यांना देण्यात आले आहे. त्यासाठी पालिका या कंत्राटदाराला दर वर्षी पाच कोटी रुपये मोजते. पालिका आयुक्तांनी गेल्या महिन्यात वंडर पार्कमधील स्वच्छतेची पाहणी केली होती.

तेव्हा तेथील स्वच्छतागृहातील ‘घाणीचे साम्राज्य’ तसेच तेथे हात धुण्यासाठी साधा साबणही नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. त्यानंतर त्यांनी संबंधित ठेकेदाराला अधिकाऱ्यांमार्फत समज देत स्वच्छतेची खबरदारी घेण्यास सांगितले होते.

२५ डिसेंबरला आयुक्तांनी या स्वच्छतागृहाला अचानक भेट दिली. तेव्हाही तेथे हात धुण्यासाठी साबण नसल्याचे आढळल्याने त्यांनी ठेकेदाराला दंड ठोठावला. दंडाची रक्कम या ठेकेदाराला देण्यात येणाऱ्या देयकातून वळती करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

वारंवार सूचना देऊनही दुर्लक्ष केल्याने ठेकेदाराला हा दंड ठोठावण्यात आला. स्वच्छतागृहात येणाऱ्या नागरिकांना साबणासारख्या साध्या सुविधाही न पुरवणाऱ्या ठेकेदारांवर यापुढे कारवाई केली जाईल.
- डॉ. एन. रामास्वामी, आयुक्त, नवी मुंबई पालिका

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com