झाडांच्या छाटणीत हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारावर दंडुका

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 ऑगस्ट 2019

प्रकरणी झाडांची छाटणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराने पालिकेने काळ्या यादीत टाकावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत. 

झाडांच्या छाटणीत हलगर्जी करणाऱ्या कंत्राटदारावर दंडुका
मुंबई : मुलुंड येथे रिक्षावर झाड पडून एकाचा मृत्यू; तर एक जण जखमी झाल्याची दुर्घटना नुकतीच घडली होती. या प्रकरणी झाडांची छाटणी करण्याच्या कामात हलगर्जीपणा करणाऱ्या कंत्राटदाराने पालिकेने काळ्या यादीत टाकावे, असे निर्देश स्थायी समिती अध्यक्षांनी दिले आहेत.

12 ऑगस्ट रोजी मुलुंड (प.) येथील एन. एस. रोड, एच.डी.एफ.सी. बॅंकेसमोर असलेले झाड एका रिक्षावर अचानकपणे कोसळून त्यात दोघे जण जखमी झाले होते. त्यांना एम. टी. अग्रवाल रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्‍टरांनी एकाला मृत घोषित केले; तर दुसऱ्या जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत.

या घटनेचे पडसाद महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीतही उमटले होते. या घटनांची गंभीर दखल घेत स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, पालिका प्रशासनाला चांगलेच फैलावर घेत जाब विचारला. झाडांची छाटणी करणाऱ्या आणि दुर्घटनांना जबाबदार कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत. 

झाडतज्ज्ञांची नेमणूक करा 
झाडांच्या दुर्घटनेत नागरिकांचा नाहक मृत्यू होत असल्याने पालिकेने झाडतज्ज्ञांची नेमणूक करून धोकादायक झाडांबाबत काळजी घेऊन त्यांची तत्काळ छाटणी करावी, अशी मागणी सर्वपक्षीय नगरसेवकांकडून करण्यात आली आहे. तसेच पालिका धोकादायक झाडांच्या छाटणीसाठी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही झाडे अथवा झाडांच्या फांद्या कोसळून वाहनांची मोडतोड होते. नागरिक जखमी होतात; तर काही नागरिक गंभीर जखमी झाल्याने त्यांचा दुदैवी मृत्यू होण्याच्या घटनाही घडत आहेत. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A contractor barks at a tree pruning contractor