ठाण्यातील तरणतलावांवर ठेकेदारांचा डोळा 

ठाण्यातील तरणतलावांवर ठेकेदारांचा डोळा 

ठाणे : महापालिकेच्या जमिनीवर अतिक्रमण होण्याचे प्रकार अनेक वेळा घडत असतात. त्यावर महापालिकेला सवड मिळेल, त्याप्रमाणे कारवाईही होत असते; पण आता तर ठाणे महापालिकेच्याच वास्तूवर अर्थात तरण तलावावर कब्जा करण्यासाठी अनेक महाभाग पुढे येऊ लागले आहेत. त्यातही उद्‌घाटन न झालेली वास्तूदेखील आपल्याच ताब्यात असल्याच्या थाटात त्या वास्तूमधील सुविधांची परस्पर विक्री करणाऱ्या ठेकेदाराविरोधात कठोर कारवाईचे संकेत पालिका प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहेत. 

खासगी संस्थांकडून त्यांच्या मनाप्रमाणे शुल्क आकारणी होत असल्यानेच अद्यापही महापालिकेकडून चालविल्या जाणाऱ्या मारोतराव शिंदे तरणतलावात प्रवेश मिळविण्यासाठी एकच झुंबड उडत असते. या तरणतलावासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यास सुरुवात केल्यानंतरही काही तासांत ऑनलाईन अर्जाची मर्यादा संपते. यावरून आजच्या घडीला तरणतलाव चालविण्याचा व्यवसाय हा ठाण्यात फायदेशीर ठरू लागल्याचे स्पष्ट होत आहे. दरम्यान, लोकमान्य नगरमधील रहिवाशांच्या सोयीसाठी स्व. रामचंद्र जनार्दन ठाकूर तरणतलाव उभारला आहे. या तलावाचे अद्यापही पालिकेकडून उद्‌घाटन करण्यात आलेले नाही. 

मात्र, लोकमान्यनगर परिसराबरोबरच वागळे इस्टेट परिसरात श्री सिद्धिविनायक एंटरटेनमेंट कंपनीकडून तरण तलावाच्या सदस्यत्वासाठी पत्रके व अर्जवाटप केले जात होते. या पत्रकावर दूरध्वनी क्रमांक नमूद केले असून, संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेने अद्यापी तरण तलाव सुरूच केलेला नाही. तसेच या तलावाचे व्यवस्थापनही कोणत्या संस्थेकडे सोपविले नाही.

या प्रकारातून सामान्य नागरिकांची फसवणूक होण्याची शक्‍यता आहे; तरी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन महापालिकेच्या वतीने पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपचे गटनेते नारायण पवार यांनी सर्वसाधारण सभेत केली होती. एवढेच नव्हे, तर महापालिकेचा तरणतलाव चालविण्यास देण्यासाठीचा ठराव महासभेत आलेला नाही, याकडेही नारायण पवार यांनी लक्ष वेधले. 

तरणतलावांची मागणी 
ठाणे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी कै. मारोतराव शिंदे तरणतलाव जलतरणपटूंसाठी उपलब्ध होता; पण शहराचे नागरीकरण वाढत असताना शहरातील इतर भागातील नगरसेवकांनी आपल्या परिसरातही महापालिकेचे तलाव उभारण्याची मागणी लावून धरली होती. त्यानंतर कळवा येथील मनीषानगर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा तरणतलाव उभारण्यात आला. त्याचबरोबर कोपरी परिसरातही तरणतलाव उभारण्यात आला; पण हे तलाव उभारल्यानंतर त्याचे व्यवस्थापन करणे शक्‍य नसल्याने महापालिकेने हे तरणतलाव खासगी संस्थांच्या ताब्यात दिलेले आहेत. वागळे इस्टेट रघुनाथ नगर येथील तरणतलावही खासगी क्‍लबच्या ताब्यात चालविण्यासाठी देण्यात आला आहे. 

संबंधितांवर गुन्हा दाखल करा 
महापालिकेचा कारभार गृहीत धरून लोकमान्यनगर येथील एक तरणतलाव आपल्या ताब्यात घेण्याची तयारी एका स्थानिक ठेकेदाराने केली आहे. कोणतीही परवानगी न घेता पालिकेच्याच लोकमान्यनगर पाडा क्र. 1 येथील तरणतलावासाठी बेकायदा सदस्यत्व जमविण्यास सुरुवात केली आहे. अशा ठेकेदारावर गुन्हा दाखल करावा, अशा सूचना माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या आहेत. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com