पाणजे पाणथळीचा ताबा रिलायन्सकडे

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेले पाणजे 16 वर्षांपूर्वीच रिलायन्सच्या ताब्यात दिल्याचे, अखेर सिडको प्रशासनाने पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीत मान्य केले आहे.

नवी मुंबई : पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असलेले पाणजे 16 वर्षांपूर्वीच रिलायन्सच्या ताब्यात दिल्याचे, अखेर सिडको प्रशासनाने पाणथळ तक्रार निवारण समितीच्या बैठकीत मान्य केले आहे. या प्रकारची गांभीर्याने दखल घेत समितीने याबाबतचा अहवाल तातडीने सादर करण्याच्या सूचना सिडको प्रशासन व रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच याबाबत राज्याच्या पर्यावरण विभागाने कारवाई करावी, असे निर्देशही दिले आहेत. 

ही बातमी वाचली का? शांतता... परिक्षा सुरू आहे

पाणथळ तक्रार निवारण समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत पर्यावरणप्रेमी सुनील अग्रवाल आणि वनशक्तीचे स्टालिन डी. यांनी पाणजेविषयी केलेल्या तक्रारीत येथे झालेला भराव, नष्ट झालेले कांदळवन हे मुद्दे उपस्थित केले होते. या वेळी सिडकोच्या प्रतिनिधींनी पाणजे 2004 मध्येच रिलायन्स समूहाला विकल्याचे (एनएमएसईझड) सांगितले. याविषयी "नेचर कनेक्‍ट'चे बी. एन. कुमार यांनी सांगितले की, सिडको सुरुवातीला पाणजेचा उल्लेख "पूरप्रतिबंधक धारण तलाव' असा करत असे. त्यानंतर मात्र त्या परिसराचा समावेश द्रोणागिरी नोडच्या विकास आराखड्यामध्ये केला गेला. या गोष्टीला विरोध केला. तसेच केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडेही पाणजेचे संरक्षण रामसर पाणथळ नियमानुसार करण्याची विनंती केली. एनएमएसईझेड ही खासगी सार्वजनिक तत्त्वावरील कंपनी असून, रिलायन्स, जयकॉर्प, स्किल इन्फ्रास्ट्रक्‍चर आणि सिडकोची त्यात भागीदारी आहे. सिडकोची 26 टक्के भागीदारी असून, पागोटे, भेंडखळ, पाणजे येथील पाणथळ, कांदळवन असलेला परिसर सिडको प्रशासनाने एनएमएसईझेडला दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. 

ही बातमी वाचली का? तिला वाचवता वाचवता तोच जळाला

भरतीवेळी पाणजेत येणारा पाण्याचा प्रवाह अडवल्याने पाणजेचे अतिशय नुकसान झाले. या बैठकीत कांदळवनांचे नुकसान होऊ नये, याकरिता सिडको प्रशासनाला पाण्याचा प्रवाह पूर्ववत सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पाणजे रिलायन्सला दिल्याची कबुली लक्षात घेता भविष्यात सिडकोकडून पाणजे वाचवण्यास ठोस पावले उचलली जातील, याची शाश्वती वाटत नाही. 
- नंदकुमार पवार, अध्यक्ष, श्री एकविरा आई प्रतिष्ठान.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: control of panje is transferred to Reliance